मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे यांची नाराजी काय ? विधानसभा अध्यक्षांनी घेतला मग ‘असा’ निर्णय…
मुख्यमंत्री असणारे प्रोटोकॉल बाजूला सारून ते सर्वाना भेटू लागले. मात्र, तरीही मुख्यमंत्री नाराज आहेत. या नाराजीचे कारण त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना सांगितले आणि मग विधानसभा अध्यक्षांनी एक मोठा निर्णय घेतला.

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे यांनी थेट ४० आमदारांना सोबत नेत उठाव केला. भाजपला सोबत घेत राज्याच्या सर्वोच्च पदी जाऊन बसले. मुख्यमंत्री झाले. राज्यकारभार हाती आला, सर्वसामान्यांना भेटणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती झाली. हजारो लोकांची मंत्रालयात गर्दी होऊ लागली. मुख्यमंत्री असणारे प्रोटोकॉल बाजूला सारून ते सर्वाना भेटू लागले. मात्र, तरीही मुख्यमंत्री नाराज आहेत. या नाराजीचे कारण त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना सांगितले आणि मग विधानसभा अध्यक्षांनी एक मोठा निर्णय घेतला.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन पाहण्यासाठी किंवा अधिवेशन काळात विधानभवनात प्रवेश मिळावा यासाठी अनेक जण धडपडत असतात. विधाससभा आणि विधान परिषदेतील आमदारांना दिवसाला प्रत्येकी चार पासेस देण्यात येतात. आमदार महोदय आपल्या खास समर्थक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत थेट विधान भवनात प्रवेश मिळवून देतात.
आमदारांना देण्यात आलेल्या या पासेसमुळे अधिवेशन काळात विनाकारण गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आमदार सभागृहात गेले की त्यांच्यासोबत आलेले समर्थक कार्यकर्ते मंत्री आणि अन्य आमदार यांच्यासोबत फोटो काढण्यात धन्यता मानतात. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या दालनात घुसून त्यांच्यासोबत फोटो काढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली आहे. याबाबत मंत्र्यांनी काही आमदारांना समज दिली होती.
परंतु, विधानभवनात अनावश्यक होणारी ही गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. त्यांनी याबद्दल आपली थेट नाराजी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे व्यक्त केली. अखेर, विधानसभा अध्यक्षांनी विधान भवनात येणाऱ्या आगंतुकांना चाप लावण्यासाठी एक दिवसाचे पासेस न देण्याचा निर्णय घेतला.
विधान भवनात असणाऱ्या प्रेक्षक गॅलरीचे पासेस याआधीच बंद करण्यात आले आहेत. आता एक दिवसाचे पासेसही बंद करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळाचे अचानक उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मंत्री महोदय अधिकाऱ्यांकडून मागवितात. मात्र, अधिकाऱ्यांनाही पासेस देण्याचे बंद करण्यात आल्याने मंत्री महोदयांना उत्तर मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्यामुळे आमदार नाराज झाले होते. अखेर, संध्याकाळी अनेक आमदारांनी अध्यक्षांकडे एक दिवसाचे पासेस सुरु करण्याची मागणी केली. परंतु, अध्यक्षांनी एंट्री पासेस बंद केल्याच्या निर्णयामुळे आज विधानभवनात तुरळक गर्दी दिसत होती.
