‘ठाकरे नाही तर हा बडा नेता होणार होता सीएम, एका रात्रीत गेम झाला अन्..’, शंभुराज देसाईंचा मोठा गौप्यस्फोट
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावरून शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आला आहे, ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे, यावरून शिवसेनेते नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?
ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत, ते थेट मुंबईला बोलवतात. आमचा जर एखादा सदस्य रुसला तर आम्ही घरी जाऊन बसतो. यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून? नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते. त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
संजय राऊतांना प्रत्युत्तर
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यानंतर 21 दिवस आम्हाला मुंबईमध्ये फिरवलं होतं. शिंदे साहेबांकडे बोट दाखवून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं? संजय राऊत आता बोलत आहेत की पवारसाहेबांचा विरोध होता. हेच ते पाच वर्षांपूर्वी का बोलले नाहीत? अजून सुद्धा पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. माझं आव्हान आहे शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला खासगीत सांगितले होते की हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांचा आहे, यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे.