शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकर यांचा मोठा दावा, उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार?
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली, पक्षात दोन गट निर्माण झाले. एक म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे शिवसेना शिंदे गट, दरम्यान पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे खरा पक्ष कोणाचा आणि पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाला द्यायचं? असा प्रश्न निवडणूक आयोगापुढे होता, अखेर निवडणूक आयोगानं पाठिंबा असलेल्या आमदारांची संख्या पाहून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. पुढे विधानसभा अध्यक्षांनी देखील हा निर्णय कायम ठेवला. दरम्यान या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात धाव घेण्यात आली होती, यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले नार्वेकर?
जे लोक माझ्या निर्णयाशी सहमत नव्हते, त्यांनी जर याचिका दाखल केली असेल तर, किंवा जे लोक निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाशी सहमत नसतील आणि त्यांनी या निर्णयाविरोधात जर याचिका दाखल केली असेल तर त्या संदर्भातील युक्तिवाद करणं त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला आहे, आता दुसरी बाजू त्यांचा युक्तिवाद करेल. त्यानंतर सर्व परिस्थितीची आणि तथ्यांची दखल घेऊन यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल.
मी जो निर्णय दिला आहे, तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व निकषात राहून मी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट यावर अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत अशा न्यायप्रविष्ट प्रकरणावर बोललं नाही पाहिजे. त्यामुळे मला वाटतं दोन्ही बाजुने सप्रीम कोर्टात आपली बाजू मांडल्यानंतर विधिमंडळ सचिवालयाने जे काही कार्य केलं असेल त्या संदर्भातील सर्व माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे, त्यामुळे मला निश्चित खात्री आहे, की येणाऱ्या काळात यावर योग्य निर्णय हेईल, असं नार्वेक यांनी म्हटलं आहे.
