Raj Thackeray : पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातला माणूस शेत जमीन का विकत घेऊ शकत नाही? राज ठाकरेंनी सांगितलं कारण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्याच्या स्थिती संदर्भात भाष्य केलय. राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्रातला माणूस गुजरातमध्ये शेत जमीन का विकत घेऊ शकत नाही, त्या बद्दल सांगितलं.

“माझ्याकडे भुसे आले होते. हिंदीच्या प्रश्नावर बोलायला. मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो हिंदी?. पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह बोलले की, मी हिंदी भाषिक नाही. मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड प्रकल्प गेला. प्रत्येक व्यक्तीला राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलल्यावर संकुचित कसे होतो?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. “मी जेव्हा म्हटलं गुजरातला आहे का हिंदी? म्हणाले, नाही. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणता?” असं सवाल राज ठाकरे यांनी केला. ते रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलत आहेत.
“यांचं राजकारण काय चाललंय हे समजून घ्या. एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठिवर तुम्हाला काहीच स्थान नाही” असं राज ठाकरे म्हणाले. “गुजरातमध्ये शेत जमिनीसंदर्भात गुजरात टेनेन्सी आणि अॅग्रीकल्चर कायद्यानुसार तुम्ही गुजरातचे रहिवासी नसाल किंवा अनिवासी भारतीय हे गुजरातमध्ये जमीन विकत घेऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्ही उद्या गुजरातमध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही. ज्या राज्यातून पंतप्रधान आणि गृहमंत्री येतात, त्या राज्यात कोणीही नागरिक जमीन विकत घेऊ शकत नाही. समजा तुम्हाला गुजरातमध्ये जमीन विकत घ्यायची असेल, तर फेमा नावाचा कायदा आहे, त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची विशेष परवानगी घ्यावी लागते” असं राज ठाकरे म्हणाले.
उत्तरेतील धनदांडगे कोकणात जमिनीच्या जमीनीच विकत घेतायत
“प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो. मग आम्ही का नाही करायचा. रायगडमध्ये कोण येतं आणि जमिनी विकत घेतं माहीत नाही. उत्तरेतील अनेक धनदांडगे आहेत, ज्यांनी कोकणात जमिनीच्या जमीनीच विकत घेत आहेत. आमचेच लोक घेत आहेत. लोकांना कळत नाही की यातून आम्हीच संपणार आहोत” असं राज ठाकरे म्हणाले.
