तुमचा कुत्रा माझ्या घरासमोर… म्हणत घरात घुसून नर्सला बेदम मारहाण, पुढे जे घडलं ते पाहून…
नवी मुंबईतील ऐरोली येथे एका तरुणीला तिच्या पाळीव कुत्र्याच्या कारणावरून तिच्याच शेजाऱ्याने बेदम मारहाण केली. मनोज नावाच्या आरोपीने निशा वाघेला नावाच्या तरुणीवर तिच्या घरात घुसून हल्ला केला. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

पाळीव श्वानाच्या त्रासावरून एका २५ वर्षीय तरुणीला तिच्या शेजाऱ्याने घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या ऐरोलीत घडली आहे. निशा वाघेला असे या जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे नवी मुंबईकरांना धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
ऐरोली येथील जुना चिंचपाडा परिसरातील आदिवासी पाड्यातील जोशी किराणा दुकानाजवळ निशा वाघेला आपली मोठी बहीण अंजू आणि तिच्या मुलीसोबत राहते. त्यांच्या घरात एक पाळीव श्वान आहे. शुक्रवारी (२० जून) पहाटे निशा घरात लादी पुसत असताना अचानक मनोज नावाचा एक इसम त्यांच्या घरासमोर आला. त्याने तुमचा कुत्रा माझ्या घरासमोर घाण करतो, त्याला सांभाळा नाहीतर तुम्हाला मारून टाकेन, असे बोलत धमकी दिली.
निशा यांनी तुम्ही असं का बोलताय, हवं तर मी घाण साफ करते असे म्हटले. त्यावर मनोजने पाठीमागून तिच्या हातातील दगडाने निशाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारहाण केली. त्यानंतर तिला लाथा बुक्क्यांनीही बेदम मारहाण करत उचलून घराबाहेर फेकून दिले. निशाच्या आरडाओरडा ऐकून शेजारील लोक जमा होऊ लागताच, मनोज तेथून पळून गेला.
रबाळे MIDC पोलिसात तक्रार
औषध आणायला गेलेल्या निशाच्या मोठ्या बहिणीला अंजु वाघेला (२८) ही घटना समजताच तिने घराकडे धाव घेतली. त्यावेळी निशा जमिनीवर पडलेली होती. तिच्या डोक्यातून आणि डोळ्याच्या बाजूने रक्त येत होते. यानंतर अंजु आणि निशा यांनी तातडीने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मनोजविरोधात गुन्हा नोंदवला.
या मारहाणीत निशा वाघेला यांच्या डोक्याला आणि डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांना वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु बेड उपलब्ध नसल्याने त्यांना तिथे दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे सध्या निशा यांच्यावर ऐरोलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
निशा वाघेला पुण्यात नर्स म्हणून नोकरी करतात आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावरच अवलंबून आहे. कारण कुटुंबात कमावणारा पुरुष नाही. एकीकडे लोकांची सेवा करणाऱ्या महिलेवरच असा हल्ला होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे, श्वानप्रेमींनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. आरोपी मनोजला कठोर शिक्षा करा अशी मागणी केली जात आहे.
