मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला धक्का

मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भाजप उभे ठाकले होते.

मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला धक्का

मुंबई : मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक 141 मधून विजयी झाले. लोकरेंनी भाजप उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव (BMC Mankhurd bypoll result) केला.

मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भाजप उभे ठाकले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 4 हजार 427 मतं मिळाली, तर भाजपच्या दिनेश पांचाळ यांना 3 हजार 042 मतं पडली. त्यामुळे 1 हजार 385 मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.

शिवसेना, काँग्रेस, भाजपसह एकूण 18 उमेदवार मानखुर्द निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते. मात्र तिरंगी मानल्या गेलेल्या या निवडणुकीत प्रत्यक्षात शिवसेना-भाजपमध्येच चुरस पाहायला मिळाली. पोटनिवडणुकीसाठी काल (गुरुवार) मतदान पार पडलं.

मानखुर्द प्रभागात एकूण 32 हजार मतदार असून काहींची नावे मतदार यादीत आलेली नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली होती. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विठ्ठल लोकरे हे आधी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीत ते अबू आझमींविरोधात उभे होते. पराभव झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेत गेले होते.

राज्यात महाविकास आघाडी असताना सेनेविरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र काँग्रेसची साथ सोडलेल्या नगरसेवकाला धडा शिकवण्यासाठी पक्षाने आपला उमेदवार दिल्याची चर्चा होती. (BMC Mankhurd bypoll result)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *