लहान घरं असणाऱ्यांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयं तासाला धुणार : राजेश टोपे

कोरोनाबाधित रुग्णांची मुंबईत होत असलेली वाढ ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

लहान घरं असणाऱ्यांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयं तासाला धुणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महापालिका (Health Minister Rajesh Tope) आणि राज्य सरकार महत्त्वाचे पावलं उचलत आहेत. मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आता शाळांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयं दर तासाला धुतली जाणार असून निर्जंतुकीकरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1135 वर पोहोचला आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची मुंबईत होत असलेली वाढ ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

“धारावी सारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊन काटेकोरपणे राबवण्यासाठी एसआरपीएफची मदत घेतली जाणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने लोकांवर नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय झोपडपट्टीभागात निर्जंतुकीरणदेखील केलं जाणार आहे”, असं राजेश टोपे यांनी  सांगितलं.

हेही वाचा : चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, 17 पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन

“सार्वजनिक शौचालयांना दर तासाला धुणार आणि निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या लोकांची राहण्याची व्यवस्था शाळांमध्ये केली जाणार आहे. संसर्ग टाळावा यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. या लोकांची भोजनाची व्यवस्था कम्युनिटी किचनच्या माध्यमातून केली जाणार आहे’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“मुंबई महापालिकेने एक लाख किट्स रॅपीड टेस्टसाठी मागितले आहेत. केंद्राकडून ते लवकरच प्राप्त होतील. सर्वात आधी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपीड टेस्ट केली जाईल”, असं आरोग्य मंत्री म्हणाले. याशिवाय मुंबईत काही ठिकानी डीसइन्फेकटंट टनलदेखील उभारले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतील कोरोनाबाधितांसोबतच मृतांच्या आकडेही झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत आतापर्यंत 857 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.

त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.

मुंबईत जी साऊथ म्हणजे लोअर परेल आणि वरळीच्या परिसरात 184 रुग्ण आढळले आहेत. तर ई वॉर्ड म्हणजे भायखळा आणि आजूबाजूच्या परिसरात 64 रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ के वेस्ट अंधेरी पश्चिम परिसरात 46 रुग्ण आढळले. हे तिन्ही परिसर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई मनपाचं मिशन धारावी, प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार, तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या

सांगलीकरांना मोठा दिलासा, 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *