‘नकोसा’ रामटेक भुजबळांच्या वाट्याला, मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप!

नव्या मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर आता मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं (Ministers bungalow) वाटप सुरु झालं आहे.

‘नकोसा’ रामटेक भुजबळांच्या वाट्याला, मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप!

मुंबई : नव्या मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर आता मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं (Ministers bungalow) वाटप सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण 7 जणांनी 28 नोव्हेंबरला पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे. (Ministers bungalow)

या मंत्र्यांना आता सरकारी बंगल्यांचं वाटप सुरु झालं आहे. तूर्तास चार मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला मिळाला आहे. तर छगन भुजबळ यांना रामटेक,  जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.

रामटेक बंगला

सरकारी निवासस्थानामध्ये अर्थातच सर्वाधिक चर्चेचा बंगला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला होय. वर्षा बंगल्यावर मंत्र्यांची रेलचेल, बैठकी, नियोजन, चर्चा हे सर्व घडत असतं. मात्र ‘वर्षा’शिवाय दुसरा चर्चेत असलेला बंगला म्हणजे रामटेक (ramtek bungalow) होय.

रामटेक या बंगल्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. छगन भुजबळ हे आघाडी सरकारच्या काळात याच बंगल्यात वास्तव्यास होते. 1999 च्या सुमारास भुजबळ या बंगल्यात आले. मात्र त्यांच्यावर तेलगी प्रकरणी आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.  याशिवाय फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांना तुरुंगवास झाला.

फडणवीस सरकारच्या काळात हा बंगला मग एकनाथ खडसे यांना मिळाला. मात्र अवघ्या दीड वर्षातच खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाला मुकावं लागलं.

भुजबळांच्या आधी हा बंगला गोपीनाथ मुंडेंकडे होता. मुंडेंवरही त्यावेळी विविध आरोप झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्र्यांना रामटेक बंगला नकोसा वाटत आला आहे. जो या बंगल्यात राहतो, त्याची खुर्ची जाते, असा समज या बंगल्याबाबत झाला आहे.

देवेंद्र फडणवीसांना सागर बंगला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मंजूर झाला आहे. हा बंगला मलबार हिल परिसरातच आहे. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे हे सागर या निवासस्थानी वास्तव्यास होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *