India Taliban Relation : तालिबान राजवटीची भारतावर विश्वास दाखवणारी आणखी एक मोठी कृती, पाकिस्तानसाठी झटका
India Taliban Relation : अफगाणिस्तानात 2021 मध्ये तालिबानची राजवट आली. त्यावेळी त्यांच्यासाठी भारतापेक्षा पाकिस्तान जास्त जवळचा होता. पण आता चार वर्षात चित्र बदललं आहे. तालिबान आता भारताच्या जास्त जवळ आहे. भारतावर त्यांचा किती विश्वास आहे ते त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं.

मागच्या महिन्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आठवड्याभरासाठी भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर आता तालिबानचे व्यापार मंत्री नवी दिल्लीत पोहोचले आहेत. तालिबानचे वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव असताना अजीजी भारत दौऱ्यावर आले आहेत. अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवर मोठा संघर्ष झाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानला लागून असलेली आपली सीमा बंद केली आहे. त्याचा फटका अफगाणिस्तानच्या फळ निर्यातीला बसत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अफगाणिस्तानचे उद्योग आणि व्यापार मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांचं भारत दौऱ्यावर हार्दिक स्वागत केलं. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं हा अजीजी यांच्या भारत दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे.
अजीजी यांच्या भारत दौऱ्यामुळे अफगाणिस्तान आणि भारतामधील आर्थिक-द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि सुदृढ होणार आहेत. ऑक्टोंबर महिन्यात मुत्तकी यांच्या दौऱ्यात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये खनिज, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीची संधी शोधण्यासाठी द्विपक्षीय व्यापार समिती स्थापन करण्यावर एकमत झालं होतं. कूटनितीक आघाडीवर भारताने काबूलमध्ये आपल्या मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला आहे. तालिबान राजवटीसोबत काम करण्यासाठी भारत गंभीर आहे असा कूटनितीक संदेश यातून गेला. अजीजी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळने इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) 2025 चा दौरा केला. हा पाच दिवसीय अधिकृत भारत दौरा व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक बळकट करण्यावर केंद्रीत आहे.
पाकिस्तानच टेन्शन वाढणार
अफगाणिस्तानच्या व्यापार मंत्र्यांचा हा भारत दौरा पाकिस्तानसाठी एक मोठा झटका आहे. कारण भारत-अफगाणिस्तान हे दोन्ही देश परस्परांच्या जवळ येत आहेत. मागच्या दोन महिन्यात अफगाण सरकारचे दोन मोठे मंत्री भारतात येऊन गेलेत. ऑक्टोंबर महिन्यात तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर मुत्ताकी भारतात आलेले. आता अफगाणिस्तानचे वाणिज्य मंत्री पाच दिवसीय भारत दौऱ्यावर आलेत. यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढलेला आहे. पाकिस्तान युद्धाची भाषा करत असताना दुसरा अफगाण मंत्री भारतात आल्याने पाकिस्तानच टेन्शन वाढणार आहे.
