आणि अशा पद्धतीने अहमदाबाद निवडणुकीत काँग्रेस न लढताच तीन जागा गमावल्या !

अहमदाबादमध्ये नारणपुराची जागा मागासवर्गीय महिलेला आरक्षित असतानासुद्धा येथे काँग्रेसने सामान्य प्रवर्गातील महिलेला तिकीट दिले. (Ahmedabad municipal corporation election Congress)

आणि अशा पद्धतीने अहमदाबाद निवडणुकीत काँग्रेस न लढताच तीन जागा गमावल्या !
CONGRESS

अहमदाबाद : महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यापैकी अमहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीची चर्चा देशभरात होत आहे. कारण येथील नारणपुराची जागा मागासवर्गीय महिलेला आरक्षित असतानासुद्धा येथे काँग्रेसने सामान्य प्रवर्गातील महिलेला तिकीट दिले. यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या महिलेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या प्रकारामुळे येथील स्थानिक नेत्यांना ही जागा नेमकी कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, याची कल्पना नव्हती का?, असा प्रश्न विचारला जात आहे. (Ahmedabad municipal corporation election Congress women candidate withdraw her application)

काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

काँग्रेसच्या या महिला उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचाही अर्ज रद्दबातल झालेला आहे. परिणामी तगडा प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे नारणपुराची जागा भाजपच जिंकणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. या सर्व प्रकारामुळे येथील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. तसेच, येथील काँग्रेस नेत्यांच्या अनभिज्ञतेमुळे आश्चर्यही व्यक्त केलं जातंय. या प्रकरानंतर यापुढे फक्त निष्ठावान कार्यकर्त्यांनाच तिकीट दिले जाईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

नारणपुरा या वार्डात काँग्रेसने चंद्रिक बेन रावल यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपतर्फे बृंदा सुरती या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. आम आदमी पार्टी (एएपी) यांनी पुष्पबेन नावाच्या एका महिलेला तिकीट देऊन भाजपविरुध्द दंड थोपटले होते. मात्र, काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांना माघार घ्यावी लागलीये.

भाजप-काँग्रेसची युती

या प्रकारामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला टीकेला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसच्या महिला उमेदवाराने ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने सडकून टीका केलीये. एमआयएमचे नेते शमशाद पठाण यांनी येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने युती केल्याचा आरोप केलाय. तसेच, येथे प्रत्यक्ष निवडणूक होण्याआधीच भाजपचे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले जात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान यापूर्वी सरदारनगर आणि ठक्करबापा नगर वार्डमध्ये येथील कांग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे अहमदाबादमधील पालिका निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक होण्यापूर्वी एकूण 192 जागांपैकी 3 जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्यायत. या अशा परिस्थितीत येथे आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बतम्या :

नागपुरात भाजपचा महापौर निश्चित, तरीही काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी

मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!

(Ahmedabad municipal corporation election Congress women candidate withdraw her application)

Published On - 8:09 am, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI