ब्रेकिंग: अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचा दावा
अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे. या भीषण दुर्घटनेत आगीमुळे मृतदेह जळाले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटविणे कठीण झाले आहे.
अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
या विमान अपघाताबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितले की, ‘अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे दिसून येत आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत होते. ते लंडनला जाणार होते. मात्र, टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाला एका निवासी भागात अपघात झाला. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते.’
BREAKING: There appear to be no survivors from Air India flight to London that crashed in Ahmedabad, city’s police chief tells AP. Follow for live updates. https://t.co/KYkwKeKhRN
— The Associated Press (@AP) June 12, 2025
इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. आता या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या देशाचे किती प्रवासी?
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पायलटचे नाव काय? किती होता अनुभव?
समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.
