Ahmedabad Plane Crash: 270 प्रावाशांचा मृत्यू, 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले तर इतर…
Ahmedabad Plane Crash: 270 प्रावाशांचा मृत्यू, 31 मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग यशस्वीरित्या पूर्ण, 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले तर इतर...

Ahmedabad Plane Crash: गुरुवारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात मृतांचा आकडा आता 270 वर पोहोचला आहे. लंडनला जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर शुक्रवार ते शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 31 मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांशी डीएनए नमुने जुळवून ओळख पटवण्यात आली आहे. मदत आयुक्त आलोक कुमार पांडे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले आहेत. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित मृतदेह नातेवाईकांना दिले जातील. यापूर्वी, 8 मृतदेहांची ओळख नातेवाईकांनी डीएनए प्रोफाइलिंगशिवाय करून घेतली होती कारण हे मृतदेह चांगल्या स्थितीत होते.
या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी एक वगळता सर्वांचा मृत्यू झाला. याशिवाय 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांसह 29 जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. अता राज्य आणि केंद्रीय संस्थांनी एकत्र काम करत याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
अहमदाबाद जिल्हा प्रशासनाने कामाचे समन्वय सुनिश्चित करण्यासाठी 230 कर्मचारी आणि तीन उप-जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी नियुक्त केले आहेत. रुग्णवाहिका आणि पोलिस पायलट सेवेद्वारे मृतदेह त्यांच्या गंतव्यस्थानावर नेले जात आहेत.
ज्या कुटुंबांना विमानाने मृतदेह घेऊन जायचे आहे, त्यांच्यासाठी सरकार एअर इंडियाशी समन्वय साधत आहे. आरोग्य विभागाने ट्रॉमा सेंटरमध्ये ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, मेडिसिन, प्लास्टिक आणि बर्न्स या विषयातील 100 तज्ञांच्या 5 टीम तैनात केल्या आहेत.
यासोबतच, पोस्टमॉर्टेम रूममध्ये 32 तज्ज्ञ आणि 20 सहाय्यकांची टीम तैनात करण्यात आली आहे आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या कसौटी भवनमध्ये 12 तज्ज्ञांची टीम तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अपघातानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
स्थानिक रहिवासी, खाजगी डॉक्टर आणि सामान्य नागरिक सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या 100 डॉक्टरांनी बचाव कार्यात मदत केली, तर 4 रक्तदान शिबिरांमध्ये 1300 युनिट रक्त गोळा करण्यात आले.
