राजाला जगवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ,अनंत अंबानींच्या पुढाकाराने एअर लिफ्टने हत्तीचे पिल्लू जामनगराला रवाना
राजाला वाचवण्यासाठी त्याला नवे जीवन देण्यासाठी आसाममधून त्याला गुजरातच्या जामनगरात नेण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अनंत अंबानी आणि वंतारा टीमचे कौतुक केले आहे.

आईनेच जन्मल्यानंतर घाबरुन की वेदनेने लाथ मारल्याने मांडीचे हाड मोडले आणि या हत्तीच्या पिलाला जन्मताच अपंगत्व आले. त्यानंतर आईचे पहिले दूध न मिळाल्या कुपोषित आणि आजारी पडलेल्या सात आठवड्याच्या राजा नावाच्या पिल्लांसाठी आता उद्योजक अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे. आसाममधील या ‘राजा’ विशेष वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून यासाठी त्याला विमानाने गुजरातमधील जामनगर येथील वंतारा येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे भारतात तिसऱ्यांदा अनंत अंबानी यांच्या पुढाकारातून हत्तींना अशा प्रकारे विमानाने उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्यात येत आहे.
वंताराचे संस्थापक अनंत अंबानी यांनी सात आठवड्यांच्या ‘राजा’ या आशियाई हत्तीच्या पिल्लाला जीवनदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जन्मतःच त्याचे मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आणि त्यानंतर एकापाठोपाठ अनेक आरोग्यविषयक गुंतागुंतींचा सामना राजाला करावा लागला आहे. त्याच्या शरीरावर एकाच जागी बसून राहिल्याने अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या पिल्लाचे मोडलेले हाड नीट करणे आणि त्यांच्यातील अन्य आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी त्याला आसाममधील पोहुमारा येथून गुजरातमधील जामनगरच्या वंतारा येथे विमानानून एअरलिफ्ट केले जात आहे.
गेल्या सात आठवड्यांपासून वंताराचे पशुवैद्यकीय पथक राजाच्या मालकाच्या घरीच त्याच्यावर उपचार करत होते.मात्र,आता त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली आहे की, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याला सुसज्ज रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक बनले आहे. आसाम ते जामनगर हे २,५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर रस्त्याने पार करणे एवढ्या लहान आणि अशक्त पिल्लासाठी धोकादायक ठरू शकले असते. राजाला काही दिवसांत नव्हे, तर काही तासांत विशेष उपचार मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनंत अंबानी यांनी त्याला सुरक्षितपणे विमानाने हलवण्याची व्यवस्था केली.
अनंत अंबानी यांच्यासाठी प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. मग तो कितीही लहान किंवा नाजूक असो. भारतात अशा प्रकारे प्राण्याला विमानाने उपचारांसाठी हलवण्याची ही तिसरी घटना आहे, जी अनंत अंबानी यांच्या सक्रीय पुढाकारामुळे शक्य झाली आहे.
गेल्या सात आठवड्यांपासून हे चिमुकले पिल्लू आपल्या छोट्याशा शरीरापेक्षा कितीतरी मोठ्या धैर्याने संघर्ष करत आहे. आता त्याला आधार देण्याची वेळ आपली आहे. जग अनेकदा इतक्या वेगाने धावत असते की, सर्वांत लहान आणि नाजूक जीवांसाठी थांबण्याचीही त्याला उसंत नसते. मात्र, अनंत अंबानी यांनी ‘राजा’ या छोट्या पिल्लाबद्दल त्यांनी दाखवलेली करुणा आणि प्रेम राजाला पुन्हा एकदा जगण्याची संधी देत आहे. रस्त्याने अनेक दिवसांचा प्रवास करावा लागला असता, तोच प्रवास आता विमानाने अवघ्या काही तासांत पूर्ण होत आहे. वंतारामध्ये त्याला पुन्हा उभे राहून त्याचे दैनंदिन हालचाल करता यावी यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करुन असे वंताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी यांनी म्हटले आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
राजाला जामनगर येथे आणण्याच्या प्रक्रियेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही वैयक्तिक लक्ष घातले. राजाचे मालक भोलानाथ पेगू यांच्या विनंतीनंतर त्यांनी वंताराशी संपर्क साधला आणि या उपचार प्रक्रियेला सहकार्य केले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या उपक्रमाचे कौतुक करीत लिहिले की, “राजाचा मालक भोलानाथ पेगू यांच्या विनंतीनंतर मी वंताराशी संपर्क साधला. वंताराने तातडीने पुढाकार घेत गुरुवारी सकाळी राजाला विशेष उपचारांसाठी जामनगर येथील पुनर्वसन केंद्रात विमानाने आणले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या कनवाळू आणि करुणावृत्तीबद्दल सरमा यांनी अनंत अंबानी आणि वंतारा टीमचे अभिनंदन केले आहे. राजाची तब्येत लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे आभार
“राजाबद्दल वैयक्तिक काळजी घेतल्याबद्दल आणि वंतारावर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे मनापासून आभारी आहोत. राजा हा आसामचा आहे आणि त्याला बरे करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आसामच्या जनतेच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमचे पथक सर्वतोपरी प्रयत्न करेल असे वंताराच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. आसाम ही भारतातील हत्तींची भूमी आहे. येथील लोकांचे हत्तींवर अतिशय प्रेम आहे. पोहुमारा येथील राजाच्या देखभाल करणाऱ्या लोकांनी गेल्या सात आठवड्यांपासून त्याचीअत्यंत प्रेमाने काळजी घेतली आहे. त्यांनी सुरू केलेली ही सेवा आणि उपचारांची जबाबदारी पुढे नेण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
राजाचा जन्म २ ऑक्टोबर २०२६ रोजी आसाममधील गोगामुख येथे झाला. त्याची आई अवघ्या ११ वर्षांची होती आणि ती स्वतःही वयाने लहान असल्याने तिला मातृत्वाचा फारसा अनुभव नव्हता. प्रसूतीनंतर ती घाबरलेली आणि अस्वस्थ होती. याच अवस्थेत तिने नवजात पिल्लाला लाथ मारली. त्यामुळे जन्माच्या पहिल्याच दिवशी राजाच्या उजव्या मागच्या पायाचे मांडीचे मोठे हाड म्हणजेच फिमर पूर्णपणे फ्रॅक्चर झाले.
सामान्यतः या वयात हत्तीचे पिल्लू आईच्या शेजारी डगमगत पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, राजाला स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा पायांवर शरीराचा भार पेलणेही शक्य नव्हते. एवढेच नव्हे, तर त्याला आईचे पहिले दूध म्हणजेच कोलोस्ट्रमही मिळू शकले नाही. नवजात पिल्लाची रोगप्रतिकारशक्ती आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी हे पहिले दूध अत्यंत महत्त्वाचे असते.
सात आठवड्यांपासून घरीच सुरू होते उपचार
राजाच्या मालकाने आणि त्याची देखभाल करणाऱ्यांनी त्याला विशेष वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे ओळखले आणि वंताराशी संपर्क साधला. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वंताराचे रॅपिड रिस्पॉन्स पथक राजापर्यंत पोहोचले.
एक्स-रे तपासणीत त्याच्या मांडीच्या हाडाचे गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. हाडाचे तुटलेले दोन्ही भाग एकमेकांवर सरकून मूळ जागेवरून विस्थापित झाले होते. त्यामुळे पथकाने प्लास्टर आणि आधार देणाऱ्या पट्ट्यांच्या मदतीने त्याचा पाय स्थिर केला. तसेच, जखमी पायावरील ताण कमी करण्यासाठी आणि त्याला उभे राहण्यास मदत करण्यासाठी विशेष स्लिंगचा वापर करण्यात आला.
त्याचबरोबर राजासाठी विशेष पद्धतीने तयार केलेले दूध सुरू करण्यात आले. त्याला दूध पाजण्यासाठी बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनाही आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
१० ऑक्टोबर रोजी राजाला त्याच्या मालकाच्या पोहुमारा येथील निवासस्थानी हलवण्यात आले. त्यानंतर वंताराचे पथक सातत्याने त्याच्यावर उपचार, देखभाल आणि चोवीस तास देखरेख करत होते. त्याच्या विश्रांतीच्या ठिकाणाजवळच एक हायड्रोथेरपी तलाव तयार करण्यात आला. त्यामुळे फ्रॅक्चर झालेल्या पायावर शरीराचा भार न टाकता त्याला हालचाल करता येईल आणि शरीराचे स्नायू मजबूत करण्यास मदत होईल.
रुग्णालयात दाखल करणे आता का आवश्यक?
आईचे दूध न मिळणे आणि मुक्तपणे हालचाल करता न येणे यामुळे राजाला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रयोगशाळेतील तपासण्यांमध्ये क्लेबसिएला न्यूमोनिया (Klebsiella pneumoniae) या जीवाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले.
त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही वारंवार कमी होत होते. रक्त तपासणीत यकृताशी संबंधित घटकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे यकृतावर ताण येत असल्याचे स्पष्ट झाले. दीर्घकाळ एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे त्याच्या डोक्यावर दाबामुळे जखमा झाल्या. याशिवाय त्याला नाभीचा हर्निया आणि सर्वसाधारण अशक्तपणाचाही त्रास जाणवत आहे.
या प्रत्येक समस्येवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकाने आवश्यकतेनुसार अँटिबायोटिक्स, शिरेतून द्रवपदार्थ, यकृतासाठी औषधे, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रोबायोटिक्स, जखमांची निगा आणि संतुलित आहार अशा विविध उपचारांचा अवलंब केला. मात्र, राजाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आता त्याला पूर्णपणे सुसज्ज रुग्णालयातच उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपचारांची गरज आहे. यामध्ये प्रगत वैद्यकीय तपासण्या, सतत देखरेख, हाडांच्या दुखापतींवरील विशेष उपचार आणि नियोजनबद्ध आहार व पुनर्वसन कार्यक्रमाचा समावेश आहे.
वंतारामध्ये राजासाठी काय उपचार असणार?
जामनगर येथे पोहोचल्यानंतर राजाला वंताराच्या हत्तींसाठी असलेल्या विशेष रुग्णालयात दाखल केले जाईल. तेथे पशुवैद्यकीय तज्ज्ञ त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करतील. त्यानंतर वेदना कमी करण्यासाठी उपचार, आवश्यक औषधे, हालचालींसाठी विशेष थेरपी आणि पोषणविषयक पुनर्वसन सुरू केले जाईल. त्याच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात घेता, कदाचित त्याला आयुष्यभर पशुवैद्यकीय उपचार आणि नियमित देखरेखीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. वंताराने त्याची आयुष्यभर काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘वंतारा’ म्हणजेच ‘जंगलातील तारा’
‘वंतारा’ म्हणजेच ‘जंगलातील तारा’. गुजरातमधील जामनगर येथे स्थित असलेला हा जागतिक स्तरावरील वन्यजीव बचाव, उपचार, कल्याण आणि संवर्धनाचा उपक्रम आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी त्याची स्थापना केली आहे. आधुनिक पशुवैद्यकीय वैद्यकशास्त्र, विशेष पायाभूत सुविधा आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मदतीने वंतारा प्राण्यांचे बचावकार्य, उपचार, पुनर्वसन आणि आयुष्यभर देखभाल करण्याचे काम करते.
