India A vs Nepal: आधी तिलक-कुमारची शतकं, नंतर हर्षित-प्रिन्सचा भेदक मारा! नेपाळची अर्धी टीम शून्यावर, भारताचा 306 धावांनी दणदणीत विजय
India 'A' team defeated Nepal: रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात इंडिया 'ए' संघाने दणदणीत विजय नोंदवला. नेपाळचा 306 धावांनी पराभव केला.

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 च्या आपल्या सलामीच्या सामन्यात भारत ‘अ’ संघाने नेपाळचा 306 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. या एकतर्फी आणि ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांना अखेरीस खूप महागात पडला.
प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 332 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात नेपाळी संघाला केवळ 26 धावांत गुंडाळले. नाणेफेक जिंकल्यानंतर नेपाळने गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सुरुवातीच्या षटकांमध्ये अगदी योग्य ठरला. कारण भारताने अवघ्या 42 धावांत आपल्या पहिल्या तीन विकेट गमावल्या. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि आयुष बडोनी स्वस्तात बाद झाल्याने भारतावर प्रचंड दबाव आला.
मात्र, त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र यांनी सूत्रे हाती घेतली. चौथ्या विकेटसाठी 206 धावांची मोठी भागीदारी रचून सामन्याचे चित्रच पालटून टाकले. कुशाग्रने 102 चेंडूंमध्ये 117 धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार तिलक वर्माने 113 चेंडूंमध्ये 107 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये युवा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने अवघ्या 14 चेंडूंमध्ये 36 धावांची स्फोटक खेळी करून डावाला अंतिम स्वरूप दिले. ज्यामुळे ‘इंडिया ए’ संघाने 332 धावांचा डोंगर उभा केला.
333 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळ संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर नेपाळी फलंदाज पूर्णपणे हतबल झाले आणि त्यांनी अवघ्या एका धावेत आपल्या पहिल्या चार विकेट गमावल्या. या सुरुवातीच्या धक्क्यातून नेपाळ सावरू शकला नाही. ठराविक अंतराने विकेट गमावत तो संघ केवळ 26 धावांत सर्वबाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांचे एकतर्फी वर्चस्व दिसून आले.
दोन्ही गोलंदाज आक्रमक वृत्तीने मैदानात उतरले. जणू काही त्यांना सामना लवकरात लवकर संपवून आपल्या हॉटेलमध्ये परतायची घाई होती. हर्षित आणि प्रिन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर नेपाळी फलंदाज हतबल झाले होते. असे वाटत होते की, एका टोकाकडून हर्षित राणा आणि दुसऱ्या टोकाकडून प्रिन्स यादव सर्वाधिक बळी घेण्यासाठी स्पर्धा करत होते. या दोन वेगवान गोलंदाजांनी मिळून नेपाळच्या फलंदाजीची फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. भारताला 306 धावांनी एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.
