सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत दबदबा, मिळाला मोठा पुरस्कार!
लोकसभेतील विशेष योगदानाची दखल घेत, हा पुरस्कार दिला जातो. 16 व्या लोकसभेनंतर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल हा विशेष पुरस्कार एकूण 17 खासदारांना देण्यात आला.

Sansad Ratna Award 2025 : लोकसभेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे एकूण 17 खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) सुप्रिया सुळे, भाजपाचे नेते रवी किशन, निशिकांत दुबे, शिवसेना ( ठाकरे गट) अरविंद सावंत यांच्यासह इतरही खासदारांचा समावेश आहे.
कोणाकोणाला मिळाला पुरस्कार
लोकसभेतील विशेष योगदानाची दखल घेत, हा पुरस्कार दिला जातो. 16 व्या लोकसभेनंतर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल हा विशेष पुरस्कार एकूण 17 खासदारांना देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (महाराष्ट्र), शिवसेना नेते श्रीरंग अप्पा बारणे (महाराष्ट्र) भाजपाच्या स्मिता उदय वाघ, शिवसेनेचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपाच्या मेधा कुलकर्णी या खासदारांचा समावेश आहे. भाजप नेते भर्तृहरी महताब (ओडिशा), क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते एनके प्रेमचंद्रन (केरळ), भाजपाचे प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, दिलीप सैकिया यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दोन स्थायी समित्यांचाही सन्मान
खासदारांव्यतिरिक्त संसदेच्या दोन प्रभावशाली स्थायी समित्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये भर्तृहरि महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्तविषयक स्थायी समिती आणि डॉ. चरणजीत सिंह चन्नी (कांग्रेस) की यांच्या अध्यक्षतेखालील कृषीविषयक स्थायी समितीचा समावेश आहे. अहवालांची गुणवत्ता, कायद्याच्या दृष्टीने दिलेले योगदान लक्षात घेऊन हा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार कोणाला दिला जातो?
संसदेत काही खासदार हे आक्रमकपणे सामान्यांचे प्रश्न मांडत असतात. एखादा प्रश्न मांडण्यासाठी काही खासदार तर दिवरात्र एक करून संबंधित प्रश्नाचा अभ्यास करतात. काही खासदारांच्या प्रश्नांमुळे तर सरकारमधील मंत्रीदेखील गोंधळून जातात. अशाच धडाकेबाज आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो. जे खासदार लोकांशी निगडित असलेल्या समस्या संसदेत उपस्थित करतात, जनतेचे प्रश्न मांडतात अशा खासदारांच्या कामाची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात. संसदेच्या प्रभावशाली स्थायी समित्यांनाही सन्मानित केलं जातं. ससंदरत्न पुरस्काराची सुरुवात 2010 साली प्राईम पॉइंट फांऊंडेशनद्वारे करण्यात आली होती.
