India Partition : भारतात तो ऐतिहासिक कागद बाहेर आला अन्…पाकिस्तानी लोकांची झोप उडाली, नेमकं प्रकरण काय?
फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. आता याच पाकिस्तानात भारतातील एका कुटुंबाची भरपूर अशी जमीन आहे. या कुटुंबाकडे या जमिनीची कागदपत्रे आहेत. अजूनही त्यांना हा ठेवा जपून ठेवला आहे.

India Pakistan Partition : भारताचे विभाजन झाल्यानंतर पाकिस्तान देशाचा जन्म झाला. भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील अनेक लोक भारतात आले. तर भारतात राहणारे अनेक लोक पाकिस्तानाच स्थायिक होण्यासाठी गेले. याच फाळणीच्या अनेक कडू-गोड आठवणी आहेत. दरम्यान, आता याच फाळणीची एक अनोखी आठवण समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाकडे आपल्या पूर्वजांनी फाळणीच्या अगदी 23 दिवस अगोदर खरेदी केलेल्या जमिनीचे कागदपत्रं आहेत. बरेलीतील या कुटुंबाने हा ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे.
बरेलीच्या कुटुंबाकडे ऐतिहासिक जुनी कागदपत्रं
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्यातील बरेलीमदील राजेंद्र नगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाकडे एक अनोखा ठेवा आहे. या कुटुंबाकडे अनेक जुनी कागदपत्रं आहेत. या कुटुंबाच्या पूर्वजांनी सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात मोठी जमीन खरेदी केली होती. खरेदीचा हा व्यवहार फाळणीच्या अवघ्या 23 दिवसांआधी झाला होता. बरेलीतील हे कुटुंब जमीन खरेदीच्या रजिस्ट्रीची कागदपत्रं चार पिढ्यांपासून सांभाळत आहे. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.
अन् 23 दिवसांनी झाली फाळणी
याच कुटुंमबातील दुर्गेश खटवानी यांनी पाकिस्तानातील जमिनीबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. दुर्गेश यांचे आजोबा देवनदास खटवानी हे सिंध प्रांतात मोठे जमीनदार होते. त्यांच्याजवळ कित्येक एकर जमीन होती. भारताची फाळणी होणार अशी तेव्हा चर्चा रंगायची. मात्र सामान्यांना मात्र भारताचे दोन तुकडे होणार नाहीत, असा विश्वास वाटायचा. याच विश्वासाच्या भावनेतून देवनदास यांनी सिंध प्रांतात काही जमीन खरेदी केली होती. त्यानंतर पुढे 23 दिवसांनी भारताची फाळणी झाली. फाळणीत देवनदास यांनी खरेदी केलेली सर्व जमीन पाकिस्तानात गेली. आता सध्या भारतात असलेल्या खटवानी या कुटुंबाकडे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जागेची फक्त कागदपत्रं आहेत. भारताचे विभाजन झाल्यानंतर पूर्ण खटवानी कुटुंब सिंध प्रांतातून भारतात आले.
50 पैशांपासून ते 50 रुपयांपर्यंतची तिकिटं
सध्या खटवानी कुटुंबाकडे त्यांच्या पूर्वजांनी सिंध प्रांतात केलेल्या जमिनीच्या व्यवहाराची अनेक कागदपत्रं आहेत. या कागदपत्रांवर 50 पैशांपासून ते 50 रुपयांपर्यंतची तिकिटं लावण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता हा अनोखा वारसा खटवानी कुटुंबीय आजदेखील सांभाळत आहे. आमच्या पूर्वजांच्या मालकीची पाकिस्तानातील जमीन आम्ही पाहून शकत नाही, याचे दु:ख खटवानी कुटुंबाला आहे.
