चिंता मिटली; भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ठरतेय अधिक प्रभावी; ‘सीरम’च्या लशीलाही टाकले मागे?

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 25800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन समितीच्या (ICMR) भागीदारीत या चाचण्या पार पडल्या होत्या. | Bharat biotech covaxin

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:35 AM, 4 Mar 2021
चिंता मिटली; भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ठरतेय अधिक प्रभावी; 'सीरम'च्या लशीलाही टाकले मागे?
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस 81 टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भारत बायोटेकने दिली.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शंका-कुशंकांच्या वादळात सापडलेली कोव्हॅक्सिन (covaxin) ही लस आता प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस 81 टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भारत बायोटेकने दिली. त्यामुळे आता परिणामकारकतेच्या बाबतीत कोव्हॅक्सिन लसीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीलाही मागे टाकल्याची चर्चा आहे. (Bharat biotech covaxin found 81% effective in interim phase 3 trails)

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 25800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन समितीच्या (ICMR) भागीदारीत या चाचण्या पार पडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस 60 टक्के प्रभावी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता ही लस अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ही लस ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही अधिक परिणामकारक ठरल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती कोव्हॅक्सिन लस

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली होती. सध्या भारतात सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लस महापालिका रुग्णालयांमध्ये तर जिल्हा रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे.

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या

1 मार्चपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वयानं ज्येष्ठ असलेल्या अनेक नेतेमंडळींनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंतच कोरोना लसीकरण केंद्रांवर लस दिली जात होती. पण आता रुग्णालये आपल्या सुविधेनुसार रुग्णांचा 24 तासांत कधीही कोरोनाची लस देऊ शकणार आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

लसीकरणाची गती वाढवण्यावर भर

कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी सरकारने वेळेची मर्यादा उठवली आहे. देशातील नागरिक आता आपल्या सोयीनुसार 24 तासांत कधीही कोरोनाची लस घेऊ शकणार आहेत. ही घोषणा करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांना नागरिकांच्या वेळेचं महत्व आणि त्यासोबतच त्यांच्या आरोग्याबाबत चांगली जाण आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस, कोरोना योद्धांचेही मानले आभार

Mumbai COVID-19 Vaccination center | मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस मिळणार, पाहा यादी

(Bharat biotech covaxin found 81% effective in interim phase 3 trails)