Bhopal Gas Leak: भोपाळमध्ये पुन्हा गॅस लीकची घटना, लोकांमध्ये भीतीचे वातावरण!
भोपाळमध्ये पुन्हा वायू गळतीची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोपाळ, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील (Bhopal) मदर इंडिया कॉलनी (Mother India Colony) वसाहतीत क्लोरीन वायूच्या गळतीमुळे (Gas Leak) खळबळ उडाली आहे. श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यात जळजळ झाल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर जमा झाले. अचानक झालेल्या या ‘गॅस घोटाळ्या’ची माहिती प्रशासनाला मिळताच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीनंतर श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने 3 जणांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची प्रकृती आता ठीक आहे.
परिसरातील नागरिकांनी तातडीने प्रशासनाला घटनेची माहिती दिली आणि काही वेळातच महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. भोपाळचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तही घटनास्थळी पोहोचले.
कशी घडली घटना
प्राथमिक तपासणीनंतर वस्तीजवळ बांधलेल्या वॉटर फिल्टर प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती होत असल्याचे पालिकेच्या पथकाला समजले. प्लांटमध्ये बसवलेल्या सुमारे 900 किलो वजनाच्या सिलिंडरचे नोजल खराब झाले. त्यामुळे त्या सिलिंडरमधून गॅस गळती होत होती.
गॅस गळती थांबवण्यासाठी महापालिकेच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने गॅस सिलिंडर पाण्यात टाकला. यानंतर 5 किलो कॉस्टिक सोडा टाकून गॅस गळती बंद करण्यात आली. तिघांना श्वास घेण्यास त्रास होत होता. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
या घटनेनंतर खबरदारी घेत प्रशासनाने आज बाधित भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस रिलीफ मंत्री विश्वास सारंग आणि भोपाळच्या महापौर मालती राय यांनी हमीदिया हॉस्पिटल गाठले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले ट्विट
भोपाळमधील गॅस गळतीच्या घटनेवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट केले आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी करताना ते म्हणाले, “मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील मदर इंडिया कॉलनीमध्ये क्लोरीन वायूच्या टाकीच्या गळतीमुळे, लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे आणि काही लोकांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ” पीडितांच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था असावी, या प्रकरणाची चौकशी व्हावी, सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. अशी मागणीही करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश की राजधानी भोपाल की मदर इंडिया कॉलोनी में क्लोरीन गैस टैंक के लिकेज होने से लोगों को आँखो में जलन एवं साँस लेने में तकलीफ़ व कुछ लोगों के अस्पताल में भर्ती होने की ख़बर सामने आयी है।
— Kamal Nath (@OfficeOfKNath) October 26, 2022
गॅस गळती आणि भोपाळ
38 वर्षांपूर्वी झालेल्या गॅस गळतीच्या घटनेमुळे भोपाळमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. 2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री गॅस दुर्घटनेच्या घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अमेरिकन कंपनी युनियन कार्बाइड फॅक्टरीमध्ये असलेल्या सर्व गॅस टाक्यांपैकी 610 क्रमांकाच्या टाकीमधून मिथाइल आयसोसायनेट गॅसची गळती झाली. भोपाळच्या काझी कॅम्प आणि जेपी नगर (आता आरिफ नगर) आणि आसपासच्या परिसरातील लोकांना या अपघाताचा सर्वाधिक फटका बसला. या घटनेच्या आठवणी स्थानिक नागरिकांसाठी अजूनही ताज्या आहेत.
