Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्तांना झटका! 20 वर्षांपूर्वीची ती फाईल उघडली… गर्जना मोर्चापूर्वीच केरळमधून मोठी अपडेट
CEC Gyanesh Kumar Vigilance Investigation: देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण तापलेले असतानाच एक मोठी अपडेट समोर येत आहे. केरळ सरकारने 20 वर्षांपूर्वीची ती फाईल उघडली आहे. त्यामुळे कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

CEC Gyanesh Kumar Vigilance Investigation: देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. दिल्ली ते तामिळनाडू आणि मुंबई ते कोलकत्त्यापर्यंत त्यांच्याविरोधात असंतोषाची ठिणगी पडली आहे. आता थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत गर्जना मोर्चा होत आहे. त्याचवेळी एक मोठी अपडेट समोर आली आहे. केरळ सरकारने जवळपास दोन दशकांपूर्वीचे जुने प्रकरण उकरून समोर आणले आहे. 2006 मधील एका भ्रष्टाचाराच्या आणि मलेशियन अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणाशी संबंधित फाईल्स राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी मागवली आहे. याप्रकरणी सतर्कता चौकशीची फाईल मागवण्यात आल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण तरी काय?
2006 मध्ये ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे सनदी अधिकारी, IAS होते, त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ते सचिव पदावर कार्यरत होते. या कालावधीत एका मलेशियन प्रकल्प अधिकाऱ्याने, ली बीन सीन याने आत्महत्या केली होती. या आत्महत्याप्रकरणात ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. ली बीन सीन याने एक सूसाईट नोट लिहिली होती. त्यात या प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्याने काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता. यामध्ये ज्ञानेश कुमार यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे.
प्रकरणात तत्कालीन डाव्या पक्षाच्या सरकारने दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाला चौकशीचे आदेश दिले होते. ज्ञानेश कुमार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव पदावरूनही हटवण्यात आले होते. या कालावधीत न्यायालयीन मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे तपास रडखला. ही फाईल धूळ खात पडली. आता नवीन सरकारने या फाईलवरील धूळ झटकली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्ञानेश कुमार चक्रव्युहात?
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांच्या सहकारी आयुक्तांनीच पहिली तक्रार दाखल केल्याचा दावा करण्यात येत आहे. या तक्रार कांडानंतर ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्याविरोधात रान उठवले आहे. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत, कोलकत्ता ते कोचिनपर्यंत त्यांच्याविरोधात विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. आज ठाकरे बंधू मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात गर्जना मोर्चा काढणार आहेत. तर शुक्रवारी सीजेपीने त्यांच्या राजीनाम्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन केले. आता ते दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन करणार आहेत.
याच दरम्यान केरळमधून ही मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी दक्षता समितीच्या फाईल्स पुन्हा बोलावल्या आहेत. चेन्निथला यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी होते. त्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशी आणि तपासाचा अहवाल आहे. त्यांच्यावर 20 वर्षांपूर्वी झालेल्या आरोपांची धूळ झटकण्यात येणार आहे. या जुन्या प्रकरणावरून नवीन राजकीय मालिका सुरू होईल का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
