ब्रिटन, कॅनडा अन् ऑस्ट्रेलियाचं भारताच्या पावलावर पाऊल, अमेरिकेला मोठा दणका, आता इस्रायलच्या भूमिकेकडं जगाचं लक्ष
ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनने भारताच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा निर्णय घेतला आहे, हा इस्रायलसोबतच अमेरिकेसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ब्रिटनसोबतच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी देखील पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. फ्रान्स देखील लवकरच पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार असल्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत भारत-चीनसह 140 पेक्षा अधिक देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलच्या बाजुनं असून, त्यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश मानण्यास नकार दिला आहे, त्यामुळेच आता ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी उचललेलं हे पाऊल इस्रायलसोबतच अमेरिकेसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, पॅलेस्टाईनला स्वातंत्र देश म्हणून मान्यता देणं म्हणजे हमासला इनाम देण्यासारखं आहे. ब्रिटनमधील मुस्लिम ब्रदरहूडकडून हमासला ताकद मिळत आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटलं आहे की हा हमासचा विजय नाहीये, भविष्यातील पॅलेस्टाईन सरकारमध्ये हमासला कोणतीही भूमिका नसेल, शांतता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी सर्व ओलिसांची सुटका करावी तसेच इस्रायलने पॅलेस्टाईनवर लादलेले सर्व निर्बंध उठवावेत, ज्यामुळे त्यांना मदत होऊ शकेल.
कॅनडा पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7 देश
ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या संदर्भात घोषणा केली, दरम्यान त्याच्या काही वेळ आधीच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून देखील पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्याची घोषणा करण्यात आली. कॅनडा हा पहिला जी सेव्हन देश बनला आहे, ज्याने पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही शांततापूर्ण भविष्य मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दरम्यान हा आता इस्रायलसह अमेरिकेला धक्का असल्याचं मानलं जात आहे.
