Central Vista Project: विरोधकांकडून पंतप्रधानांच्या नव्या घराची किंमत वाढवून सांगितली जातेय; भाजपचा दावा

केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधक या प्रकल्पाची किंमत चढवून सांगत असल्याचे म्हटले. | central vista project

Central Vista Project: विरोधकांकडून पंतप्रधानांच्या नव्या घराची किंमत वाढवून सांगितली जातेय; भाजपचा दावा
सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट

नवी दिल्ली: मोदी सरकारचा सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट सध्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरत आहे. कोरोनाच्या काळात या प्रकल्पाचा खर्च, या प्रकल्पासाठी जमीनदोस्त करणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (Central Vista Project)  खरचं गरजेचा आहे का, असे अनेक सवाल विरोधकांकडून विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली आहे. (Opposition exaggerated the cost of pm modi new house and central vista project)

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची आखणी डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी खर्च करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधक या प्रकल्पाची किंमत चढवून सांगत असल्याचे म्हटले.

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट काय खरं आणि काय खोटं?

1. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टसाठी 20 हजार कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती चुकीची आहे. सेंट्रल व्हिस्टा एवेन्ह्यूसाठी 477 कोटी तर नव्या संसद भवनासाठी 862 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा सगळा खर्च मिळून 1300 कोटींच्या घरात जातो.

2. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. या प्रकल्पासाठी कोणतीही वृक्षतोड केली जाणार नाही. या प्रकल्पाच्या बांधकामावेळी प्रदूषण टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

3. या प्रकल्पासाठी अनेक ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्यात येणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी इंडिया गेट, संसद, उत्तर आणि दक्षिण ब्लॉक, राष्ट्रीय अभिलेखागार यापैकी कोणतीही सूचीबद्ध वास्तू पाडली जाणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

4. पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी 13,450 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकल्पातंर्गत एकूण 10 इमारती बांधण्यात येणार आहेत. अद्याप यासाठीचे टेंडरही निघालेले नाही. विरोधक खर्चाचा आकडा वाढवून सांगत असल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी यांनी म्हटले.

संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे. ही वास्तू त्रिकोणी आकाराची असेल. संसद भवनाच्या इमारतीसाठी साधारण 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही इमारत 2022 पर्यंत बांधून तयार होईल, असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

‘पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’

(Opposition exaggerated the cost of pm modi new house and central vista project)