अभिजीत दीपके, सौरव आणि रांका यांना सर्वात मोठा झटका, दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 10 ऑक्टोबरपूर्वीच
सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी 20 जुलैच्या संसद मार्चमधील हिंसाचाराच्या चौकशीमुळे मोठा धक्का बसला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनापूर्वी ही चौकशी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, पोलिसांनी सीजेपी नेत्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधीच सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मोठा झटका बसला आहे. 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या संसद मार्च दरम्यानच्या हिंसेची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे सीजेपी नेते आणि कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या चौकशीचा भाग म्हणून दिल्ली पोलीस सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची चौकशी करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. IANSने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू केली आहे. या आंदोलनावेळी हिंसा भडकली होती. या हिंसेची ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी BNSच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
17 एफआयआर रद्द
चौकशी दरम्यान या हिंसेला कोण जबाबदार होते? त्यांची भूमिका काय होती? याचा तपास केला जाणार आहे. ठरवून हिंसाचार करण्यात आला की या आंदोलनात घुसखोरांनी घुसखोरी करून हिंसा केली याचाही तपास केला जाणार आहे. पोलिसांवरील कथित हल्ले, तोडफोड, पोलिसांची वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचं झालेलं नुकसान याचाही तपास केला जाणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी जुलैच्या हिंसेप्रकरणी दाखल केलेले 17 एफआयआर रद्द केलेले आहेत.
सीजेपीची तयारी
दरम्यान, सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मोठं आंदोलन करून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय सीजेपीने जाहीर केला. या आंदोलनासाठी सीजेपीने दिल्ली पोलिसांकडे परवानगीसाठी संपर्क केला होता. मात्र, जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी कमीत कमी 10 दिवस आधी परवानगी घेतली पाहिजे, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. तरीही सौरव दास, अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका हे दिल्लीच्या आंदोलनाची तयारी करत आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
इंडिया आघाडीचा एल्गार
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या तीन दिवसापासून इंडिया आंघाडीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. रोज दुपारनंतर इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत आंदोलन करत आहेत. काल जंतरमंतरवर इंडिया आघाडीने आंदोलन केलं. आत कॅनोट पॅलेस येथे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनात पहिल्यांदाच टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी समील झाल्या आहेत. कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.
