घरात दीड वर्षांचा अपंग मुलगा, म्हातारा बाप... 26 वर्षीय रमेश यादव शहीद!

वाराणसी : अवघ्या दीड वर्षांचा आयुष काकांच्या कुशीत बसून, घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे टकमक टकमक पाहतोय. देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत समजण्याची या चिमुकल्या जीवाला अद्याप समज नाहीय. मात्र, या हल्ल्याने या चिमुकल्या जीवाचं छप्पर हिरावून घेतलंय. दीड वर्षांच्या आयुषचे वडील रमेश यादव पुलवामा हल्ल्यात शहीद झाले आहेत. रमेश यादव हे सीआरपीएफचे जवान होते. चिमुकल्या आयुषला जन्मापासूनच एक …

घरात दीड वर्षांचा अपंग मुलगा, म्हातारा बाप... 26 वर्षीय रमेश यादव शहीद!

वाराणसी : अवघ्या दीड वर्षांचा आयुष काकांच्या कुशीत बसून, घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे टकमक टकमक पाहतोय. देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत समजण्याची या चिमुकल्या जीवाला अद्याप समज नाहीय. मात्र, या हल्ल्याने या चिमुकल्या जीवाचं छप्पर हिरावून घेतलंय. दीड वर्षांच्या आयुषचे वडील रमेश यादव पुलवामा हल्ल्यात शहीद झाले आहेत. रमेश यादव हे सीआरपीएफचे जवान होते.

चिमुकल्या आयुषला जन्मापासूनच एक त्रास आहे. त्याच्या पायाची वाढ नीट झाली नाहीय. पुढच्या सुट्टीत घरी येऊन आपल्या चिमुकल्या बाळाच्या पायांवर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न करणार होते. त्याला हॉस्पिटलमध्ये नेणार होते. मात्र, रमेश यादव देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर गेले ते परत आलेच नाहीत. पुलवामातील दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात रमेश यादव शहीद झाले.

वाराणसीच्या चौबेपूर भागातील तोफापूर गावाचे रमेश यादव हे रहिवासी. दोन दिवसांपूर्वीच सुट्ट्या संपल्याने देशाच्या सेवेत ते हजर झाले होते. सुट्टीत घरी असताना, चिमुकल्याला ते डॉक्टरकडे घेऊन गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनाही रमेश यादव म्हणाले, पुन्हा येईन, तेव्हा आयुषसाठी खास बूट घेऊन येईन आणि स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवून त्याच्या पायांवर उपचारही करेन.

गुरुवारी म्हणजे हल्ल्याच्या काही तास आधी रमेश यादव हे त्यांची पत्नी रेणू हिच्याशी बोललेही होते. मुलाला त्यांनी फोनवरुनच हाक मारली, मुलाचा आवाज ऐकला. मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळात यादव कुटुंबाला हादरा देणारी बातमी आली. पुलवामा हल्ल्यात रमेश यादव शहीद झाल्याचे कुटुंबाला कळले आणि यादव कुटुंबासह अवघं तोफापूर गाव दु:खात बुडून गेलं.

आता काकांच्या कुशीत बसून चिमुकला आयुष येणाऱ्या-जाणाऱ्याकडे टक लावून पाहतोय, कुतुहलाने पाहतोय. त्याला नेमके काय घडलंय, हेच कळत नाहीय. त्याची समज अजून तेवढी नाही. दुसरीकडे, रमेश यादव हे शहीद झाल्याचे कळताच, त्यांचे वडील जमिनीवरच पडून आहेत. हयातीत 26 वर्षांच्या मुलाचा मृत्यू पाहणं, हे किती कठोर असू शकतं, हे शब्दात कसे सांगावे!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *