दिल्ली बाँबस्फोटाचं इराण कनेक्शन? कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्फोट? वाचा सविस्तर

दिल्ली बाँबस्फोटाचं इराण कनेक्शन? कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्फोट? वाचा सविस्तर

इराणचा सर्वात शक्तिशाली मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी इराकची राजधानी बगदादमध्ये हत्या करण्यात आली. (Delhi Blast Israel Embassy)

अनिश बेंद्रे

|

Jan 30, 2021 | 2:14 PM

नवी दिल्ली : दिल्लीत काल इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या बाँबस्फोटाचे धागेदोरे शोधायला सुरुवात केलीय. आणि यातून जी माहिती समोर येतेय त्यात स्फोटाचं इराण कनेक्शन तर नाही ना असा संशय बळावत चाललाय. टार्गेट जरी इस्त्रायली दूतावास असला तरी स्फोट भारतात घडलाय तेही दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत त्यामुळे त्याचं महत्त्वही मोठं आहे. (Delhi Blast near Israel Embassy allegedly connected to Iran Qasem Soleimani Death)

सीसीटीव्हीत कैद स्फोट घडवणारे?

दिल्ली पोलीसांच्या स्पेशल टीमनं इस्त्रायली दूतावासाजवळचे जवळपास सर्व महत्त्वाचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. त्यात तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज स्फोट घडवणाऱ्यांपर्यंत नेऊ शकतात, अशी आशा तपास यंत्रणा एनआयएला आहे. एका कॅबमधून दोघे उतरले, त्या कॅबनेच दोघा संशयितांना घटनास्थळाजवळ सोडल्याचं सीसीटीव्हीत उघड झालं आहे. स्पेशल टीमनं कॅब ड्रायव्हरशी संपर्क साधला आहे. संशयितांचे स्केच बनवण्यात आलेत. त्यावरुन त्यांचा शोध सुरु आहे.

आतापर्यंत काय हाती लागलं?

ज्या एपीजे अब्दुल कलाम रोडवर हा बाँबस्फोट घडला आहे, त्या ठिकाणी तपास यंत्रणांना एक लिफाफा मिळाला आहे. त्यात इराणचा लष्करी कमांडर कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांचा उल्लेख शहीद असा केलेला आहे. इराणचेच अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरजाहेद यांचाही उल्लेख चिठ्ठीत शहीद असाच आहे. सोबतच हा फक्त ट्रेलर असल्याचंही लिफाफ्यातल्या चिठ्ठीत म्हटलंय. या दोन्ही नावांवर दिल्ली स्फोटाचं इराणी कनेक्शन काही आहे का याचा शोध तपास यंत्रणा करतायत.

कोण होते कासिम सुलेमानी?

इराणचा सर्वात शक्तिशाली मेजर जनरल होते कासिम सुलेमानी. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी कासिम सुलेमानी यांची इराकची राजधानी बगदादमध्ये हत्या करण्यात आली. अमेरिकेने बगदादच्या एअरपोर्टजवळ ड्रोनने कासिम यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यात ते मारले गेले. अमेरिकेने नंतर ह्या हत्येचं जगजाहीर समर्थन केलं. कासिम सुलेमानी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर तर होतेच पण गुप्तचर यंत्रणचेही ते प्रमुख होते. इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयतुल्लाह अल खामेनी यांनाच ते थेट रिपोर्ट करायचे. कासिम यांनी इराणसाठी पश्चिम आशियात मोठं नेटवर्क उभं केलं. त्यातूनच अमेरिकाविरोधी मोठी फळी तयार झाली. त्यांच्या हत्येनंतर इराणमध्ये प्रक्षोभ उसळला. खुद्द सर्वोच्च धर्मगुरु अंत्यविधीत ढसाढसा रडल्याचं जगानं पाहिलं. कासिम यांच्या अंत्यविधीला एवढी गर्दी उसळळी की, झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांनी जीव गमावला. (Delhi Blast near Israel Embassy allegedly connected to Iran Qasem Soleimani Death)

कासिम यांची हत्या अमेरिकेनं केली तर इस्त्रायल का टार्गेटवर?

जागतिक स्तरावर अमेरिका आणि इस्त्रायल हे एकमेकांचे दोस्त राष्ट्र आहेत. भारतही मोदी सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून ह्या दोस्त राष्ट्रांचाच पार्टनर झाला आहे. त्यामुळे इस्त्रायलला टार्गेट करणं म्हणजे एकाच वेळेस भारत आणि अमेरिकेलाही टार्गेट करण्यासारखं आहे. त्यामुळे दिल्लीत झालेल्या स्फोटाचे तार आणखी कुठपर्यंत जातात हे पहाणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट; नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना

दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती; ‘त्या’ दोन संशयितांचा शोध सुरू

(Delhi Blast near Israel Embassy allegedly connected to Iran Qasem Soleimani Death)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें