Delhi Bomb Threat: दिल्ली पुन्हा हादरली! चार कोर्ट आणि दोन शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेसेज… पोलीस अलर्ट; काय घडतंय?
Delhi Bomb Threat: दिल्लीतील साकेत, पटियाला हाउस, तीस हजारी आणि रोहिणी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. द्वारका आणि प्रशांत विहार येथील दोन सीआरपीएफ शाळांना ई-मेलद्वारे अशीच धमकी मिळाली आहे.

लाल किल्लाजवळ झालेल्या स्फोटानंतर आता पुन्हा दिल्लीतील साकेत न्यायालय, पटियाला हाउस, तीस हजारी आणि रोहिणी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच चारही परिसरांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली असून कॅम्पसची तपासणी सुरू आहे. पोलिसांना आतापर्यंत काहीही संशयास्पद सापडले नाही. दिल्लीतील चार न्यायालयांव्यतिरिक्त दोन सीआरपीएफ शाळांनाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये द्वारका आणि प्रशांत विहार येथील शाळांचा समावेश आहे. ही धमकी ई-मेलद्वारे पाठवली गेली आहे.
जैश-ए-मोहम्मदच्या नावाने धमकी
सूत्रांच्या मते, न्यायालय परिसरांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशात स्पष्टपणे सांगितले आहे की न्यायालय कॅम्पसमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अशा कोणत्याही धमकीला हलक्यात घेत नाहीत. म्हणून माहिती मिळताच सर्व कॅम्पसमध्ये तीव्र तपासणी सुरू करण्यात आली आहे. हा ई-मेल जैश-ए-मोहम्मदच्या नावाने पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दिल्ली स्फोटातील आरोपीची पटियाला न्यायालयात हजेरी
ही धमकी आणखी गंभीर मानली जात आहे. कारण ज्या पटियाला हाउस कोर्टला बॉम्बस्फोटाची धमकी पाठवली गेली आहे, तिथे आज दिल्ली स्फोटातील आरोपीला हजर केले जाणार आहे. त्यामुळे पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत.
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर लोकांमध्ये दहशत
गेल्या सोमवारी, 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी दिल्लीतील उच्च सुरक्षा क्षेत्र लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 20 जण जखमी झाले होते. हा एक दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्याचा संबंध जम्मू-काश्मीर, फरिदाबाद आणि उत्तर प्रदेशातील पांढरपेशा संशयित दहशतवादी डॉक्टरांशी आहे. या स्फोटानंतर दिल्लीतील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दिल्लीसह प्रत्येक राज्यात सुरक्षा कडक करण्यात आली असून दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करताना प्रत्येक कानाकोपऱ्यात तपास सुरू आहे. दरम्यान, दिल्लीतील मोठ्या संस्था जसे की न्यायालये आणि सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळणे हे सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
