El Nino Alert: पावसाळा सोडा, हिवाळा पण.. एल निनोच्या इफेक्टबद्दल चिंता वाढवणारी माहिती समोर
El Nino Alert: अल निनोने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. जूनमध्ये मुहूर्त हुकवणारा पाऊस जुलैमध्ये मुसळधार कोसळला. पण त्याने ऑगस्टमध्ये मोठा ब्रेक घेतला. सप्टेंबरची सुरुवातही मोघाम राहिली. आता हिवाळ्याविषयी मोठं आक्रीत घडलं आहे. काय आहे मोठा दावा?

अल निनोने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. भारताला अल निनोचा जरदार फटका बसला आहे. देशात पावसाची तूट झाल्याने एकूण 741 जिल्ह्यांपैकी 350 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा मुहूर्त यंदा पावसाने हुकवला. जुलैमध्ये तो धो धो बरसला. तर ऑगस्ट महिन्यात अपुऱ्या पावसामुळे देशातील जवळपास 47 टक्के भागाला गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. एल निनो आता आणखी तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) गुरुवारी याविषयीची मोठी अपडेट दिली. त्यानुसार, फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनोचा त्रास जाणवेल. यामुळे हिवाळ्यातील गुलाबी, बोचरी थंडी अनुभवता येणार नाही.
एल निनो मुक्कामी, हिवाळा अधिक उष्ण
एल निनो फेब्रुवारीपर्यंत मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. एल निनो आता अधिक प्रखर आणि तीव्र होईल. त्याचा परिणामही दिसेल. जगातील अनेक भागांना अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. देशातील हिवाळा यंदा अधिक उष्ण असेल. लोकांना हिवाळ्यातील गुलाबी, बोचरी थंडी अनुभवता येणार नाही. कमी पर्जन्यमान आणि पोषक हवामान नसल्याने रब्बी पिकांवर मोठा परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव
जागतिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, एल निनो यंदा मानव जातीचा पिच्छा सोडायला तयार नाही. एल निनो फेब्रुवारी 2027 पर्यंत तळ ठोकून असेल. तर या काळात पारा वाढलेला असेल. उष्णतेच्या झळा हिवाळ्यापासूनच जाणवतील. हिवाळ्यात थंडी गायब होईल. जगभरातील अनेक देशातील हवामान विभागाने एकच सूर आळवल्याचे दिसून येत आहे. यामुळे एल निनोचे परिणाम पाहता व्यापक उपाय योजना करण्याची तयारी अनेक देशातील सरकार करत आहेत.
प्रशांत महासागराच्या तापमानात मोठी वाढ
एल निनो दिवसागणिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाणी सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या अधिक उष्ण आहे. एल निनोचा हा प्रभाव आहे. Nino 3.4 हे एल निनोची तीव्रता मोजण्याचे मापक आहे. या निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. मे-जुले 2026 या कालावधीत हा निर्देशांक सरासरीपेक्षा सुमारे 1.5 अंश सेल्सिअस अधिक आहे. जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत या निर्देशांकाने 2.2 ते 2.6 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
रब्बी पिकांवर मोठा परिणाम
एल निनोचे संकट गडद झाल्यास देशातील रब्बी हंगाम धोक्यात येऊ शकतो. हिवाळ्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास गव्हासह हरभरा, मोहरी आणि इतर रब्बी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम दिसू शकतो. हिवाळ्यातील परतीचा पाऊस आणि तापमान, पोषक वातावरण रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे असते. यामध्ये मोठा बदल झाल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते.