हिंदू धर्म विसरल्या का?, मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांना सुनावलं; नेमकं काय आहे प्रकरण?
Mukesh Khanna: अभिनेते मुकेश खन्ना यांनी 'वंदे मातरम'वरील शर्मिला टागोर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शर्मिला यांच्या धर्माबद्दलही थेट सवाल उपस्थित केला आहे.

‘वंदे मातरम्’च्या निमित्ताने सुरू झालेला वाद आता बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम्’च्या कडव्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला टागोर यांच्या मतावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेवरही भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम्’वर आपलं मत व्यक्त केलं होतं. भारतात विविध धर्मांचे लोक राहतात आणि काही लोक एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतात, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या मते, ‘वंदे मातरम्’च्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये अडचण नाही; मात्र पुढील कडव्यांमध्ये अनेक देवी-देवतांचा उल्लेख असल्याने एकेश्वरवाद मानणाऱ्या लोकांना ती कडवी म्हणणं कठीण वाटू शकतं.
शर्मिला टागोर यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता मुकेश खन्ना यांनी याच मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत शर्मिला टागोर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या पटौदी कुटुंबातील विवाहाचा संदर्भ देत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी शर्मिला यांना ‘आयशा बेगम’ असा उल्लेख करत, लग्नानंतर त्यांना इस्लाम धर्माबाबत जाणीव झाली का, असा सवाल केला. तसंच संपूर्ण आयुष्य हिंदू संस्कृतीत वाढल्यानंतर आता अचानक इतर धर्मांच्या भावनांची चिंता का वाटत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुकेश खन्ना म्हणाले, “लग्नानंतर तुम्हाला इस्लाम अस्तित्वात आहे हे कळलं का? जेव्हा तुम्ही बेगम झालात, तेव्हा तुम्हाला कळलं का की, मुसलमान वेगळ्या धर्माचं पालन करतात? लग्नामुळे तुम्ही आयेशा बेगम झालात, पण आजही तुम्ही आयेशा बेगम म्हणूनच बोलत आहात. मला हे समजत नाही की आयुष्यभर हिंदू म्हणून जगल्यानंतर तुम्हाला अचानक दुसऱ्या धर्माची चिंता का वाटू लागल आहे?”
इतकंच नाही तर मुकेश खन्ना यांनी शर्मिला यांच्या बंगाली पार्श्वभूमीचाही उल्लेख केला. बंगालमध्ये कालीपूजा आणि बंगाली संस्कृतीत वाढलेल्या शर्मिला यांनी आता ‘वंदे मातरम्’मधील देवी-देवतांच्या उल्लेखाबाबत अशी भूमिका का घेतली, असा त्यांनी सवाल केला. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या भूमिकेचा आधार देताना म्हटलं की, हिंदू धर्मात देवाची अनेक रूपं मानली जात असली तरी ईश्वर एक आणि निराकार आहे. भक्त त्याला हनुमान, शिव, राम किंवा कृष्ण अशा वेगवेगळ्या रूपांत पाहू शकतो, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, ‘वंदे मातरम्’ म्हणताना प्रत्येकाने देश आणि राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करायला हवा. मात्र, एखाद्याला शारीरिकरित्या वाकण्यास किंवा मस्तक झुकवण्यास जबरदस्ती करू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
