गर्लफ्रेंडचे कलेवर चितेवर जाण्यापूर्वी त्याने तिच्या कपाळी कुंकू लावले, आजीवन लग्न न करण्याची शपथही घेतली…
एका युवकाने त्याच्या मृत प्रेयसीच्या अंतिम यात्रेपूर्वी तिच्या भांगेत कुंकू भरले आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर या तरुणीच्या कलेवराला वधूच्या वेषात त्याच्या घरी नेले. नंतर या मृत तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खरे प्रेम नशिबवाल्यांना मिळते असे म्हणतात. आजच्या काळात तर प्रेमात दगाबाजी, नात्यातील फोलपणा आणि क्षणभंगुर सुखासाठी विश्वासाला तडे बसत असताना. आजच्या कलियुगातही असे घडू शकते यावर किंचितही विश्वास न बसणारी एक कहाणी समोर आली आहे. आपल्या मृत गर्लफ्रेंडचे कलेवर चितेवर जाण्यापूर्वी तिच्या कपाळी कुंकू लावत त्याने तिच्याशी विवाह केला, त्यानंतर त्याने आजीवन लग्न न करण्याची शपथ घेतली..चितेला अग्नी दिला. ही हृदय हेलावणारी घटना कोलकाता येथील आहे…
पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील एक अमर प्रेम कहाणी समोर आली आहे. येथे एका युवकाने त्याच्या मृत प्रेयसीच्या अंतिम यात्रेपूर्वी तिच्या भांगेत कुंकु भरले आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला , लग्नाचे विधी पार पडल्यानंतर या मृत तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रेमी युवकाचे नाव सागर बारिक आहे. हा युवक कोलकाता येथे राहणारा आहे. तर मृत तरुणी मौली मंडल हावडा येथील राहणारी होती, सागर २३ वर्षांच्या मौली हिच्याशी प्रेम करीत होता. मौली हिला साल २०२३ मध्ये एका दुर्धर आजाराने घेरले. तपास केला तर कळले तिला कॅन्सर आहे. त्यानंतर या तरुणीला केमोथेरपी देण्यात आली, त्यावेळी तिच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली.
अंतिम संस्काराआधी लग्नाचे विधी पार पडले..
सागर आणि मौली लवकरच लग्न करणार होते. परंतू २ मे रोजी रुग्णालयात मौली हीने अखेरचा श्वास घेतला. मौली यांच्यावर अंतिम संस्कार करण्याआधी तिच्या लग्नाचे विधी पूर्ण करण्यात आले. सागर याने मौली हिच्या भांगेत कुंकू भरले, तिच्या वडिलांच्या घरातून तिला स्वत:च्या घरी नेले. तेथून नंतर मौलीला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
सागरला याची कायम खंत राहील
सागर याने सांगितले की मला मौलीची अंतिम इच्छा पू्र्ण करायची होती. मौली हीने तिच्या कॅन्सरबद्दल आधीच सागरला सांगितले होते. कालीघाटच्या मंदिरात पूजा करायची मौलीची इच्छा होती. सागरला तिची अंतिम इच्छा पूर्ण करु न शकल्याबद्दल खेद वाटत आहे. मौली हिचा भाऊ अनिमेष याने सांगितले की माझी बहिण खूपच नशीबवाली आहे की तिच्या जीवनात सागर आला. सागर आणि त्याच्या कुटुंबाने कठीण काळात मौलीला आधार दिल्याबद्दल अनिमेष याने आभार मानले आहेत.
