उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! भूस्खलनामुळे 249 रस्ते बंद, आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 249 रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 249 रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यापैकी 207 रस्ते हे मंडी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मंडी ते धरमपूर (कोटली मार्गे) राष्ट्रीय महामार्ग 3 जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गाचा मंडी-कुल्लू हा भाग 10 तासांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावरून रस्त्यावर माती आणि दगड पडल्यामुळे वाहतूक थांबवावी लागली आहे, यांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता आता रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात 20 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. या पावसामुळे आतापर्यंत सुमारे 751 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. SEOC च्या म्हणण्यांनुसार पाऊस आणि पुरामुळे राज्यातील 463 विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि 781 पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
गेल्या 2 दिवसांपासून हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुरारी देवी येथे सर्वाधिक 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पांडोहमध्ये 79 मिमी, स्लेपरमध्ये 67.7 मिमी, कोठीमध्ये 60.4 मिमी, मंडीमध्ये 53.2 जोगिंदरनगरमध्ये 53 मिमी, भुंतरमध्ये 47.6 मिमी, भरारीमध्ये 40 मिमी, नेरीमध्ये 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाकडून अलर्ट
हवामान विभागाने राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. सुंदरनगर, मुरारी देवी, भुंतर आणि कांगडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. स्थानिक हवामान विभागाने 18 जुलैपर्यंत 10 जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 92 लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच काही लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी
हवामान विभागाने उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उधम सिंह नगर, बागेश्वर, पौडी, नैनिताल आणि पिथोरागड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
