Delimitation Bill: विरोधात असताना स्टॅलिन, शरद पवार यांनी कसा भरला होकार? डिलिमिटेशन बिलामागील इनसाईड स्टोरी
Stalin-Pawar Delimitation Bill: सात महिन्यांपूर्वी एमके स्टॅलिन आणि शरद पवार हे विरोधात असताना डिलिमिटेशन बिलावर त्यांनी अचानक भूमिका बदलली. पण या दोन पक्षांनी अचानक होकार कसा भरला? वाचा ती इनसाईड स्टोरी...

Stalin-Pawar Delimitation Bill: एप्रिल 2026 मध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधयेक 54 मतांनी नामंजूर झाले होते. त्यात अर्थातच ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि द्रमुक यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अगोदर तृणमूलवर हल्लाबोल झाला. 20 खासदार फुटले आणि अनेक आमदार पक्षाबाहेर पडले. पण राष्ट्रवादी आणि द्रमुकबाबत भाजपने जरा वेगळे धोरणे राबवले. सात महिन्यांपूर्वी एमके स्टॅलिन आणि शरद पवार हे विरोधात असताना डिलिमिटेशन बिलावर त्यांनी अचानक भूमिका बदलली. पण या दोन पक्षांनी अचानक होकार कसा भरला? वाचा ती इनसाईड स्टोरी…
द्रमुकने का बदलली भूमिका?
वर्षभरापूर्वी मोदी सरकारने द्रमुकशी अनौपचारिक संवाद सुरू केला होता. तरीही तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हाती काही लागले नाही. तामिळनाडू विधानसभेत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेटी कळघम (TVK) पक्षाने 108 जागा काबीज केल्या. तर द्रमुक 54 जागांवर अडकली. राज्यातील या बदलत्या समीकरणानंतर काँग्रेसने द्रमुकची साथ सोडली. राहुल गांधी यांनी विजय थलपतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे काँग्रेस-द्रमुकमध्ये दुरावा निर्माण झाला. द्रमुकने लोकसभेत काँग्रेसपासून वेगळे बसण्याची विनंती केली. यावेळी काँग्रेसने समजूतदारपणाची भूमिका घेतली नाही. फटकून वागण्याची, तुटक वागण्याचा वचपा आता द्रमुक घेत असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढ, राज्यांचे 1971 मधील नमुद गुणोत्तर प्रमाण कायम ठेवण्याचे, 2051 पर्यंत जागांचे प्रमाण न बदलण्याची हमी भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार राष्ट्रवादीला काय फायदा?
राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचे जोरकस प्रयत्न झाले. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधामुळे विलिनीकरण झाले नाही. तर सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गट स्वतंत्र पक्ष म्हणून रालोआमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले होते. ऑगस्टमध्ये राष्ट्रवादीच्या आठ खासदारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली होती. तर या महिन्याच्या सुरुवातीला पवार रुग्णालयात असताना मोदींनी त्यांची संपर्क साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळतो असे म्हटल्याचे वृत्त समोर आले होते. तेव्हापासून सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य मंत्रिपदाचीच नाही तर राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना आपण चार चार जेपीसीवर असल्याचे म्हटले आहे. डिलिमिटेशनविषयी राष्ट्रवादीने ज्या हरकती घेतल्या होत्या, त्या पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
