सहा एक्सप्रेस हायवे, अमेरिकेची स्ट्रॅटर्जी अन्… पाकिस्तानचा माज उतरवण्यासाठी भारताचा ‘परफेक्ट प्लॅन’, नेमकं नियोजन काय?
निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी भारतीय हवाई दलाच्या तयारीचे, भारत-पाकिस्तान हवाई दलांच्या तुलनेचे आणि अमेरिकेच्या धोरणाचे विश्लेषण केले आहे. गंगा एक्सप्रेसवेवर झालेल्या राफेल, मिराज आणि जग्वार यांच्या लँडिंगच्या सरावावर ते बोलले.

भारताने नुकतंच गंगा एक्स्प्रेसवेवर विराट शक्ती दाखवली आहे. राफेल, जग्वार आणि मिराजने उड्डाण यशस्वीरित्या पार पडले. भारतीय हवाई दलाच्या सरावात तीन प्रमुख लढाऊ विमानांचा समावेश आहे. यामध्ये राफेल, मिराज-2000 आणि जग्वार यांचा समावेश आहे. ही विमाने गंगा एक्सप्रेसवेवर दिवसा टच अँड गो लँडिंगसह नाईट व्हिजन गाईडेड लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवले. यावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सहा महामार्ग विकसित
भारतीय हवाई दलाने महामार्गांवर लँडिंग आणि टेकऑफची केलेली प्रात्यक्षिके हे भारताच्या नवीन धोरणाचा भाग आहे. युद्धाच्या स्थितीत एअर फोर्स स्टेशन्सला नुकसान पोहोचल्यास विमानांना उतरण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हे सहा महामार्ग विकसित करण्यात आले आहेत. मिरज-दिल्ली हायवे, गंगा एक्सप्रेस हायवे आणि दिल्ली-जयपूर हायवे यांसारख्या महामार्गांचा यात समावेश आहे, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानचे हवाई दल भारताच्या तुलनेत खूपच कमी
“भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाची तुलना केल्यास पाकिस्तानचे हवाई दल भारताच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे एक तृतीयांश आहे. त्यांच्याकडे काही क्षेपणास्त्रे जास्त असली तरी त्यावर बसवण्यासाठी वॉर हेड (युद्ध सामग्री) त्यांच्याकडे नाही. त्यांच्याजवळ फक्त आण्विक शस्त्रे आहेत. ती त्यांची मोठी समस्या आहे. चीनने त्यांना दिलेली संरक्षण प्रणाली ते सीमेवर तैनात करत आहेत. त्यातून मार्ग काढण्याची क्षमता भारताकडे आहे. यात कोणतीही शंका नाही”, असेही अभय पटवर्धन यांनी सांगितले.
मोठं युद्ध नको, अमेरिकेचा सल्ला
अमेरिकेच्या धोरणाबद्दल बोलताना कर्नल पटवर्धन म्हणाले, “अमेरिकेचे जुने धोरण आहे की सगळ्यांनी दहशतवादी शक्तींविरुद्ध लढले पाहिजे. भारतावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेला दुःख झाले आहे आणि म्हणूनच त्यांनी भारताला कारवाई करण्याचे सांगितले आहे. मात्र, ही कारवाई मर्यादित असावी जेणेकरून त्याचे रूपांतर सर्वंकष युद्धात होऊ नये, अशी त्यांची अट आहे. त्यांनी भारताला सर्जिकल स्ट्राईक किंवा जमिनीवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु त्याचे पर्यवसान मोठ्या युद्धात होऊ नये याची काळजी घेण्यास सांगितले आहे.”
पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा
कर्नल अभय पटवर्धन यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर या पूर्वीच्या घटनांचा दाखला देत भाष्य केले आहे. “फाळणीनंतर पाकिस्तानने वेगवेगळ्या वेशात आपले सैनिक सीमेपर्यंत आणले होते. त्यावेळी आयएसआय (ISI) अस्तित्वात नव्हती. आयएसआयने कबालींच्या वेशात आपले सैनिक घुसवले होते, ज्यामुळे १९६८ चे युद्ध झाले. १९७१ मध्ये त्यांनी थेट सैनिक न पाठवता युद्ध केले. कारगिलच्या वेळीसुद्धा त्यांनी दुसऱ्या वेशात सैनिक पाठवले होते. १९९८ नंतर त्यांची बॉर्डर ॲक्शन टीम (BAT) पाठवण्याची आणि आयएसआयच्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी आपले लोक पाठवण्याची नीती बनली आहे. त्यांचे सैनिक आणि अधिकारीसुद्धा प्रशिक्षणासाठी जातात. आयुब खान यांनी हे सुरू केले होते आणि परवेझ मुशर्रफ यांनी त्याला मूर्त स्वरूप दिले. त्यामुळे बिलावल भुट्टो किंवा त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबद्दल काही बोलले, तरी त्यात नवीन काही नाही”, असे कर्नल अभय पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
