राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या मोर्चात वातावरण तापलं, अंधार पडताच घडामोडी वाढल्या
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आधी राहुल आणि प्रियांका यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर त्यांना उचलून आकाशवाणी भवन परिसरातून ताब्यात घेतलं.

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनात आता मोठी घडामोड घडली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय पोलिसांकडून आता इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी थेट कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली असून राहुल गांधी यांचे अनेक कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. राहुल गांधींचा गेल्या ८ तासांपासून याठिकाणी ठिय्या पाहायला मिळत आहे. आकाशवाणी भवन परिसरामध्ये हे ठिय्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांच्या आंदोलनावेळी पोलिस दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे आकाशवाणी भवन परिसरातील एका झाडाजवळ बसून ठिय्या करत होते. तेव्हा त्यांच्याबरोबर दीपेंद्र हुड्डा, शाम बर्वे, वर्षा गायकवाड, अशा सर्व खासदारांना पोलिसांनी आधी समजावलं. पण त्यानंतर पोलिसांनी अचानक या सगळ्या नेत्यांना उचललं. त्यांना नेण्यासाठी तीन बस आणल्या होत्या. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी बसमध्ये चढण्यास तीव्र विरोध केला. तरीही त्यांना बळजबरीने पोलिसांनी बसमध्ये ढकललं. त्यानंतर या तिनही बस आकाशवाणी भवन परिसरातून पुढे निघून गेल्या. इथेच पुढे मुख्य निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी आम्हाला भेटावं, आमच्याशी बोलावं, अशी भूमिका राहुल गांधींनी आणि त्यांच्यासोबतच्या खासदारांनी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुख्य मागणी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याची आहे. पण सध्या भेटण्याची भूमिका तरी घ्यावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व खासदारांना आता दिल्ली पोलिसांकडून किंग्जवे पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जेव्हा आंदोलन सुरु केलं होतं तेव्हा पोलिसांनी यापूर्वीही राहुल गांधींना याच पोलिस ठाण्यात नेलं होतं.
