Boycott Turkey : PAK चा मित्र तुर्कीवर भारताकडून स्ट्राइकला सुरुवात, पहिला पुण्यातून दुसरा….
Boycott Turkey : युद्ध सदृश्य स्थितीत पाकिस्तानची खुलेआम साथ देणाऱ्या तुर्कीवर भारतातून स्ट्राइक सुरु झाले आहेत. याची सुरुवात पुण्यातून झाली आहे. तुर्कीचेच ड्रोन्स वापरुन पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. हे ड्रोन्स भारताने हवेतच निकामी केले. आता भारतातून तुर्कीला धडा शिकवण्याची मोहिम सुरु झाली आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणाव फक्त राजकीय, सैन्य आणि कूटनितीक पातळीवर मर्यादीत नाहीय. सर्वसामान्य जनता सुद्धा यामध्ये आपल्यापरीने भूमिका बजावत आहे. देशातील व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य आपल्या निर्णयांमधून पाकिस्तान आणि त्यांच्या मित्र देशांबद्दलचा आपला राग, संताप दाखवून देत आहेत. युद्ध सदृश्य स्थितीत तुर्कीने खुलेआम पाकिस्तानची साथ दिली. तुर्कीचेच ड्रोन्स वापरुन पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारताने हे सर्व ड्रोन्स हवेतच निकामी केले, तो भाग वेगळा. सध्या सगळ्या देशात ‘बॉयकॉट तुर्की’ अभियान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील पुण्यापासून राजस्थानच्या उदयपूरपर्यंत व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून आयात करण्यात आलेल्या वस्तुंवर बहिष्कार टाकून तुर्कीला आर्थिक आघाडीवर उत्तर द्यायची घोषणा केली आहे.
पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरुन आयात करण्यात आलेल्या सफरचंदांची विक्री बंद केली आहे. स्थानिक बाजारपेठेतून ही सफरचंद गायब झाली आहेत. ग्राहकांनी सुद्धा बहिष्कार घातला आहे. दरवर्षी पुण्यात फळ बाजारात तुर्कीच्या सफरचंदांचा हिस्सा 1000 ते 1200 कोटींचा असतो. पण हा व्यवसाय आता ठप्प झाला आहे.
हा निर्णय देशभक्तीच्या भावनेने प्रेरित
“आम्ही टर्कीवरुन सफरचंद मागवणं पूर्णपणे बंद केलं आहे. त्याऐवजी हिमाचल, उत्तराखंड, इराण आणि अन्य ठिकाणांहून सफरचंद मागवत आहोत. हा निर्णय देशभक्तीच्या भावनेने प्रेरित आहे. सरकारच्या समर्थनार्थ हा निर्णय घेतला आहे” असं पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटमधील व्यापारी सय्योग जेंडे यांनी सांगितलं. “तुर्कीच्या सफरचंदांची मागणी 50 टक्क्याने घटली आहे. ग्राहकांनी जाहीरपणे बहिष्कार घातला आहे” असं एका अन्य फळ व्यापाऱ्याने सांगितलं.
जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश
आशियातील सर्वात मोठं व्यापार केंद्र असलेल्या उदयपूर येथील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरुन मार्बल आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच एकमेव कारण म्हणजे तुर्कीने केलेलं पाकिस्तानच समर्थन. उदयपुर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराना यांनी सांगितलं की, “जो पर्यंत तुर्की पाकिस्तानच समर्थन करेल, तो पर्यंत त्यांच्याशी व्यापार करणार नाही. भारतात आयात होणाऱ्या एकूण मार्बलचा 70 टक्के हिस्सा तुर्कीवरुन येतो. पण आता ही आयात बंद केली आहे” “फक्त उदयपूरच नाही, देशातील सर्व मार्बल असोशिएशनने तुर्कीशी व्यापार बंद केला, तर जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश जाईल. फक्त भारत सरकारच नाही, देशातील इंडस्ट्री आणि सर्वसामान्य जनता सुद्धा सरकारसोबत आहे” असं कपिल सुराना म्हणाले.