अमेरिकेत पुन्हा भारतीय नागरिकाची हत्या, विद्यार्थ्यावर गोळीबार, घटनेनं खळबळ
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुळ हैदराबादचा रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यावर अमेरिकेत गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुळ हैदराबादचा रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यावर अमेरिकेत गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या डलासमध्ये एका पेट्रोल पंपावर हा विद्यार्थी काम करत होता, याचदरम्यान या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.चंद्रशेखर पोल असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर पोल हा हैदराबादवरून अमेरिकेत बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) चं शिक्षण घेण्यासाठी 2023 मध्ये गेला होता. त्याने नुकतीच अमेरिकेमध्ये आपली मास्टर डिग्री पूर्ण केली होती, तसेच तो अमेरिकेच्या डलासमध्ये एका पेट्रोल पंपावर पार्ट टाईम जॉब देखील करत होता, पार्ट टाईम काम करताना तिथे पूर्ण वेळ नोकरीचा त्याचा शोध सुरू होता. याचदरम्यान ही घटना घडली आहे, पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना रात्रीच्यावेळी घडली आहे, जेव्हा ही घटना घडली तेव्हा चंद्रशेखर पोल यांची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट दरम्यान काम सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीनं पोल यांच्यावर गोळीबार केला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली? का घडली? याबाबत आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, तेथील पोलीस यंत्रणा घटनेचा तपास करत आहे.
दरम्यान पोल यांच्या कुटुंबानं चंद्रशेखर पोल यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आमची मदत करावी अशी विनंती भारत सरकारकडे केली आहे. हैदराबादमधील बीआरएसचे आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री टी हरीश राव यांनी ही घटना दुर्दैवी असून आम्ही पीडित कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे. ही घटना खुप दुख:द आहे. आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी खूप स्वप्न पाहिले होते. मात्र ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारने या कुटुंबाची मदत करावी असं माजी मंत्री राव यांनी म्हटलं आहे.
