मिसाइलचा मारा इराणवर.. पण उडाला जगभरातील किचनमधील तेलाचा भडका! वाढलेल्या तेलाच्या किंमतीचा भारतावर मोठा परिणाम
इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम तेलाच्या किंमतीवर होणार आहे. तेलाच्या किंमतीत किती वाढ झाली आहे? जाणून घ्या...

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील चालू युद्ध आता इराणपर्यंत पोहोचले आहे. इस्त्रायलने इराणामधील तेहरानवर मिसाइल हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव टोकाला पोहोचला आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतींवर दिसू लागला आहे. अवघ्या दोन दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती 10 डॉलर प्रती बॅरल वाढून 75 डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतासारख्या देशांवर, जे आपल्या ऊर्जा गरजांचा 85% आयातीद्वारे पूर्ण करतात, या बदलाचा थेट परिणाम होऊ शकतो.
भारतावर परिणाम किती खोलवर?
भारत आपल्या एकूण तेल गरजांपैकी सुमारे 44.6% भाग फक्त मध्य पूर्वेतून आयात करतो. अशा परिस्थितीत जर हा तणाव लांबला, तर कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. भारताने आपल्या पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणली असली तरी कच्च्या तेलाच्या किंमतीत 10% पेक्षा जास्त वाढ झाल्यास आयात बिलात 90,000 कोटी रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
वाचा: MAYDAY… MAYDAY… विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने दिला होता सिग्नल, काय आहे अर्थ?
कशा प्रकारे होईल परिणाम?
महागाईत उडी: जर कच्च्या तेलाच्या किंमतीत 10 डॉलर प्रति बॅरल वाढ झाली, तर किरकोळ महागाई दरात 0.5% पर्यंत वाढ होऊ शकते. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या आवश्यक वस्तू महाग होतील, ज्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चही वाढेल.
आयात बिलावर दबाव: तेल महागल्याने भारताचा चालू खाते तूट (CAD) वाढू शकतो, ज्याचा परिणाम परकीय चलन साठ्यावर होईल.
रुपया घसरणार: जास्त डॉलरच्या मागणीमुळे आणि वाढत्या आयात बिलामुळे रुपयात घसरण होऊ शकते. यामुळे केवळ तेलच नव्हे तर इतर आयात केलेल्या वस्तूही महाग होतील.
आर्थिक विकास मंदावणे: वाढलेल्या खर्चामुळे उद्योग आणि सेवांच्या वाढीवर परिणाम होईल, ज्यामुळे जीडीपी वाढीमध्ये घट दिसू शकते.
शेअर बाजारात घसरण: मध्य पूर्वेत तणाव वाढण्यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये बाजारात मोठी घसरण दिसली होती. यावेळीही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
नोकऱ्यांवर परिणाम: जेव्हा मागाई वाढते, तेव्हा कंपन्या खर्च कपातीचे उपाय करतात. याचा परिणाम नोकऱ्या, पगार आणि बढतींवर होऊ शकतो.
भारताची तयारी
भारताने तेल आयातीचे स्रोत अनेक देशांपर्यंत विस्तारले आहेत. सध्या रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे, जो एकूण आयातीचा सुमारे 35-40% हिस्सा देतो. याशिवाय इराक, सौदी अरब, UAE, व्हेनेझुएला, नायजेरिया आणि अमेरिकेतूनही तेल खरेदी केले जाते.
सरकारने बायोइंधन आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या पर्यायांवर काम वेगाने सुरु केले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की भारताकडे पुरेसा साठा आहे आणि जागतिक संकट असूनही पुरवठा खंडित होणार नाही.