रणरणत्या उन्हात पायी चालल्या, जया बच्चन यांच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाल्या, जोपर्यंत…
दिल्लीत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार मोर्चा काढला, ज्यात जया बच्चन, राहुल गांधींसह 19 विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'लोकशाही वाचवा' हा नारा दिला.

एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चात विरोधी पक्षाचे 140 हून अधिक खासदार सहभागी झाले आहेत. संसदेवरून निघालेला हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या दिशेने जात असतानाच मध्येच अडवल्याने खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण तापलं आहे. या मोर्चात समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चनही सामील झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी त्या या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.
खासदार जया बच्चन या आंदोलकाच्या वेषातच या मोर्चात सामील झाल्या आहेत. यावेळी जया बच्चन यांच्याशी मीडियाने संवाद साधला. तुम्ही किती दूरपर्यंत चालत जाणार आहात? असा सवाल जया बच्चन यांना करण्यात आला. त्यावर, जोपर्यंत माझे पाय चालतात, पाय साथ देतात, तोपर्यंत मी चालत जाईल, असं जया बच्चन म्हणाल्या. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. भाजपचं कामच आरोप नाकारणं आहे. आरोप चुकीचे असल्याचं सांगणं आहे. पण आमचं जे काम आहे, ते आम्ही करत आहोत. भगवान गणेश चुकीच्या कामाला मदत करत नाहीत. आम्ही गणेशाकडे प्रार्थना करतोय. ते आमचं संरक्षण करतील. आम्ही गणेशाच्या पूजेपासूनच शुभारंभ करत असतो. आता तेच आमची देखभाल करतील, असं जया बच्चन म्हणाल्या.
#WATCH दिल्ली | चुनाव आयोग तक INDIA ब्लॉक के सांसदों के विरोध मार्च पर समाजवादी पार्टी की सांसद जया बच्चन ने कहा, “गणेश जी गलत कामों में मदद नहीं करते हैं। हम गणेश जी की पूजा से ही प्रार्थना शुरू करते हैं; वे हमारी रक्षा करेंगे।” https://t.co/HsJFvKzQ4H
— ANI_HindiNews (@AHindinews) October 6, 2026
जिथे मोर्चा अडवला, तिथेच ठिय्या
दरम्यान, इंडिया आघाडीचा मोर्चा आकाशवाणी भवनाच्या 400 मीटरवर अडवण्यात आला. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी रस्त्यावर बसूनच ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी खासदारांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र, या मोर्च्यात आम आदमी पार्टीचा एकही खासदार सामील नव्हता.
ताब्यात घेऊन सोडलं
हा मोर्चा सुरू असताना पोलीस आणि नेत्यांमध्ये वादावादी झाली. राहुल गांधी बॅरिकेडिंगवर चढले. त्यांनी बॅरिअरवर चढून तिरंगा झेंडा फडकवला. तर, दुसरीकडे इतर खासदार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत होते. पोलिसांनी हा मोर्चा पांगवण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळाने पुन्हा त्यांना सोडून देण्यात आलं.
पोलिसांनी परत सोडल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवनाच्या दिशेने कूच केली. दोन्ही नेते आकाशवाणी भवनात घुसले. त्यांच्यासोबत दीपेंद्र हुड्डाही होते. सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवल्याने पुन्हा वातावरण तापले.
19 पक्ष, 3 किलोमीटरचा मार्च
आजच्या मोर्चात काँग्रेससह 19 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. ‘सेव्ह डेमोक्रॅसी मार्च’ असं या मोर्चाला नाव देण्यात आलं होतं. संसदेपासून 3 किलोमीटर पायी चालत या आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली होती. मात्र, त्यांना मध्येच अडवण्यात आल्याने विरोधकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्सही लावण्यात आल्या आहेत.
