लाल सोडा हिरवा पण नाही, विना अडथळा करा प्रवास; ट्रॅफिक लाईटशिवाय धावणारे भारताचे पहिले शहर, तुम्हाला माहिती आहे का?
India First City Without Traffic Lights: शहरात वाहतूक कोंडीच्या त्रासाने चाकरमानी मेटाकुटीला येतो. लाल, हिरव्या, पिवळ्या दिव्याच्या तालावर नाचावं लागतं. पण हे शहर प्रामाणिकपणे त्याला अपवाद आहे.

India First Traffic Light Free City: भारताची कोचिंग क्लासेसची राजधानी (City Of Coaching Classes) म्हणून राजस्थानमधील कोटा शहर विख्यात आहे. पण या शहरांनं अजून एक विलक्षण टप्पा गाठला आहे आतापर्यंत देशातील इतर कोणत्याही शहराने ही कमाल केली नाही. या शहरात आता ट्रॅफिक सिग्नलचा अडथळा नसेल. शहरवासियांना लाल, हिरव्या, पिवळ्या दिव्याच्या तालावर नाचावं लागणार नाही. ट्रॅफिक लाईटशिवाय या शहरात फिरता येईल. स्मार्ट नियोजन आणि नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधांमुळे शहरातील पादचाऱ्यांना पण रस्त्यांवरुन चालणं सोपं झालं आहे.
काय केला प्रयोग
कोटाच्या अर्बन इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने (UIT) हा उपक्रम राबवला. विना अडथळा, न थांबणाऱ्या वाहतुकीसाठी नियोजन केले. एकमेकांशी जोडलेल्या रिंगरोडचे जाळे बांधले. पारंपारिक गर्दीच्या चौकांना बायपास करून या वाहनांना इच्छित स्थळी जाता येते. त्यामुळे त्यांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होत आहे. शहराची गतिशीलता आणखी वाढवण्यासाठी, शहरातील प्रमुख चौकात दोन डझनहून अधिक उड्डाणपूल आणि अंडरपास करण्यात आले. त्यामाध्यमातून शहर जोडण्यात आले. या पध्दतीने सिग्नलवर थांबण्याची गरज उरत नाही. वाहनधारक विना विलंब सहज शहरात फिरू शकतात. परिणामी, प्रवास जलद तर होतोच, शिवाय अपघातही कमी होतात आणि इंधनाची बचत होते आणि प्रवास अधिक सुरळीत आणि पर्यावरणपूरक होतो.
कोटाचा आदर्श इतर शहरांना
कोटाचे उदाहरण आता इतर भारतीय शहरांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या या शहराने हे दाखवून दिले की काळजीपूर्वक शहरी रचना आणि पायाभूत सुविधा पुरवल्यास शहरवासीयांना वाहन कोंडीतून बाहेर आणता येते. कोटामध्ये दररोज रहिवासी आणि हजारो विद्यार्थी प्रवास करतात. शहरात आता एक वाहतूक परिसंस्था तयारी झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास गतिमान झाला आहे.
काही शहरांमध्ये रस्त्यांवरही अतिक्रमण आहे. मुख्य रस्ते, हमरस्ते आणि बाजारपेठेतील रस्ते, फुटपाथ हे सर्व अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले आहे. त्यामुळे या शहरात अंडरपास, ओव्हरब्रिज असूनही ट्रॅफिक जॅमची समस्या कायम आहे. अशावेळी अतिक्रमण काढून, वाहनधारकांना शिस्तीचे धडे देऊन अनेक शहरातील वाहतूक कोंडी कमी करता येऊ शकते. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत केल्यासही खासगी वाहनं रस्त्यावर येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आपोआप कमी होते असा धडा या शहराने दिला आहे.
