Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

कामाच्या शोधात आपलं गाव सोडून शहरात आलेले मजूर लॉकडाऊनमध्ये पुन्हा आपल्या गावाला परतत आहेत.

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

हैदराबाद : कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग रोखण्यासाठी (Lockdown Effect Labor Died) देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र, याचा सर्वाधिक फटका हा रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात आपलं गाव सोडून शहरात आलेले मजूर लॉकडाऊनमध्ये पुन्हा आपल्या गावाला परतत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची कुठलीही सुविधा नसल्याने हे मजूर सामानाचं ओझं आपल्या पाठीवर लादून पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत. रोजगार, कामधंदा (Lockdown Effect Labor Died) सुटल्यामुळे अनेक मजूर हताश झाले आहेत. अशाच एका 23 वर्षीय मजुराचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

जवळपास तीन दिवसांपूर्वी लोगेश बालासुब्रमनी (Logesh Balasubramani) नावाचा मजूर 26 लोकांसह नागपूरहून त्याच्या गावी नामक्कलकडे निघाला. 500 किमीचं अंतर पार केल्यानंतर तो बुधवारी सिकंदराबादच्या शेल्टर होममध्ये (Secunderabad Shelter Home) पोहोचला आणि बघता बघता काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला. लोगेश हा एका ठिकाणी बसला होता आणि अचानकपणे तो पडला. त्यामुळे लगेच डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी लोगेशला मृत घोषित केलं. त्यानंतर लोगेशचा मृतदेह (Lockdown Effect Labor Died) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

लोगेशसोबत सिकंदराबाद येथे पायी येणाऱ्या लोकांच्यामते, ते तीन दिवसांपासून सतत चालत आहेत. रस्त्यात त्यांना कुठलंही साधन न मिळाल्याने त्यांना पायीच हा प्रवास करावा लागला. रस्त्यात त्यांना अनेकांनी जेवण दिलं आणि काही ट्रक चालंकानी थोड्या अंतरापर्यंत त्यांना लिफ्ट दिली. त्यांची मदत करणाऱ्या ट्रक चालकांना पोलिसांनी मारहाण केली.

माहितीनुसार, नागपूर आणि तेलंगाणामध्ये वाढत्या उष्णतेमुळे गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 38 डिग्री सेल्सिअस आहे. तर नागपुरातून स्थलांतर करत असलेल्या मजुरांच्या पाठीवर ओझं लादण्यात आलं आहे. लोगेशच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या लोकांनी स्थानिक नेत्यांची मदत मागितली आहे. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी अन्यथा ते पायी घरी जातील, (Lockdown Effect Labor Died) असा इशारा या मजुरांनी दिला आहे.