Pahalgam Terror Attack : पहलगामचा दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला? तिथं गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने सांगितलं नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमधील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात काही माहाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात काही माहाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर पहलगामला छावणीचे स्वरुप आले आहे. जिकडे-तिकडे भारतीय सैनिक दिसत आहेत. दरम्यान, पहलगामध्ये फिरायला गेलेल्या एका महाराष्ट्रीय नागरिकाने तिथे नेमकं काय घडलं होतं? याची माहिती दिली आहे.
आईस लेनचा आनंद घेण्यासाठी जातात पर्यटक
पहलगाममध्ये महाराष्ट्राचे हरिस सोलिया नावाचे पर्यटक पहलगाममध्ये गेले होते. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. हल्ला झाला त्यावेळी तिथं नेमकी काय परिस्थिती होती? दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला? याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. “पहलगाममध्ये आईस लेन आहे. या आईस लेनचा आनंद घेण्यासाठी त्या भागात पर्यटक जातात. तिकडेच आम्हीदेखील होतो. माझ्यासोबत चार ते पाच ज्येष्ठ नागरिक होते त्यामुळे मी खालीच होतो. वर गेलो नाही. वरच्या भागात गोळीबार झाला आहे,” अशी माहिती हरिश सोलिया यांनी दिली.
30 किलोमीटरच्या रस्त्यावरील दुकानं बंद
तसेच, ही घटना घडल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, आर्मीच्या गाड्याही येथे आल्या आहेत. चंदनवाडी ते पहलगाम हा 30 किलोमिटरचा रस्ता आहे. याच रस्त्यावरून आम्ही आलो होतो. या रस्त्यावरची सर्व दुकानं बंद झाली आहेत. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका दिसत होत्या. पोलीसांचाही ताफा दिसत होता, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू, चार जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक फिरायला गेले होते. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचा समावेश आहे. सरहद संस्थेने तशी माहिती दिली आहे. यात एकजण गंभीर जखमी आहे. जखमींमधील 4 पैकी 2 जण पुण्यातील आहेत. माणिक पाटील, एस. भालचंद्र यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
दरम्यान, या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्तक केल्या आहेत. तसेच या हल्ल्याचा निषेध केला आहे. दुसरीकडे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे थेट जम्मू काश्मीरमध्ये तातडीने पोहोचले आहेत.
