साध्वी प्रज्ञा सिंह यांची निर्दोष सुटल्यावर पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या, हिंदू दहशतवादाच्या जन्मदात्याचं…
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा भगवा आणि सनातन धर्माचा विजय आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाची जनक काँग्रेससह सर्व धर्मद्रोही बदनाम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केलं.

2008 साली झाले्ल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष मुक्त केले. खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर शनिवारी साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेसवर निशाणा साधला. “न्यायालयाच्या या निर्णयामुळे भगवा, हिंदुत्व आणि सनातनचा विजय झाला आहे आणि भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे” असे म्हणत त्यांनी एक पोस्ट लिहीली आहे.
मालेगाव येथे 17 वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विषेश न्यायलयाने गुरुवारी निकाल दिला. एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी मानले गेले होते. मात्र अखेर न्यायलयाने त्यांच्यासह 7 जणांना निर्दोष मुक्त केलं. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते.
काँग्रेसवर निशाणा
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. ” भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाची जनक असलेल्या काँग्रेससह सर्व धर्मद्रोहींचा चेहरा काळा झाला आहे.” न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, “भगवा, हिंदुत्व आणि सनातनच्या विजयाबद्दल सर्व सनातनी आणि देशभक्तांचे अभिनंदन.”
साध्वी प्रज्ञा यांची सोशल मीडिया पोस्ट
भगवा आतंकवाद और हिन्दू आतंकवाद के जन्मदाता कांग्रेस सहित सभी विधर्मियों का मुंह हुआ काला.. भगवा ,हिंदुत्व और सनातन की विजय पर समस्त सनातनियों और देशभक्तों का हुआ बोलबाला बहुत-बहुत बधाई…. जय हिन्दूराष्ट्र, जय श्री राम…
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) August 1, 2025
कोर्टाच्या निर्णयानंतर झाल्या होत्या भावूक
गुरुवारी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा न्यायालयात भावनिक झाल्या. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मला 13 दिवस छळण्यात आले. मी एका संन्यासीचे जीवन जगत होते. या प्रकरणात आरोपी घोषित झाल्यानंतर मला खूप अपमान सहन करावा लागला. मला दहशतवादी ठरवण्यात आले. मी 17 वर्षांपासून संघर्ष करत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणात भगवा कलंकित झाल्यांचही त्यांनी नमूद केलं होतं.
29 सप्टेंबर 2008 साली मालेगावमध्ये एका मशिदीजवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. तपास यंत्रणेने त्या मोटारसायकलची मालकीण साध्वी प्रज्ञा असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर 23 ऑक्टोबर 2008 रोजी तिला अटक करण्यात आली. मात्र, 2017 साली साध्वी प्रज्ञा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. गुरूवारी या खटल्याचा निकाल देताना, सुनावणीदरम्यान न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
