रात्र होताच तिच्या अंगात नागीण सळसळते… नवरा टरकला, म्हणाला, मला माझ्या बायकोपासून…
उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका पतीने आपली पत्नी रात्री नागीण बनत असल्याचा अजब दावा केला आहे. या तक्रारीने पोलीस अधिकारीही चक्रावले. अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.

साहेब! मला माझ्या बायकोपासून वाचवा हो ! रात्र होताच तिच्या अंगात नागीण सळसळते, रात्री ती नागीण बनते… एवढं म्हणून पहाडासारखा दिसणारा तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. पण त्याचे ते बोल ऐकून समोरचे सगळेच सुन्न झाले. खरंतर हा प्रकार उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधला आहे. तिथे, एका तरुणाने धाव घेत अधिकाऱ्यांकडून मदत मागितली. त्याने असा दावा केला की, त्याची पत्नी, रात्री नागीण बनते. नागिणीचं रूप धारण करून ती मला दंश करण्याचा प्रयत्न करते. तिला मला जीवानिशी मारायचं आहे.
त्या तरूणाच्या, तक्रारीच्या आधारे प्रभारी अधिकाऱ्याने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. पाहता पाहता हा प्रकार सगळीकडे पसरला आणि परिसरात चर्चेचा विषय बनला. मात्र असं काही खरंच घडू शकतं का ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. वृत्तानुसार, संपूर्ण समाधान दिवसाला आलेल्या या माणसाने प्रभारी अधिकाऱ्याला सांगितले की तो खूप त्रासलेला आहे. तो म्हणाला, “साहेब, कृपया मला वाचवा… माझी पत्नी रात्री नागीण बनून मला मारण्याचा प्रयत्न करते.”
एवढंच नव्हे तर पीडित इसमाने त्याच्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोपही केला. मात्र त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. पण त्याने ज्या पद्धतीने त्याची पत्नी नागीण झाल्याबद्दल सांगितले ते ऐकून सर्वांनाचा मोठा धक्का बसला. यानंतर, प्रभारी अधिकाऱ्याने चौकशी आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
नेमकं काय झालं ?
महमूदाबादमधील लोढासा येथील मेराज यांचा मुलगा मुन्नाने तक्रार पत्र देऊन म्हटलं की, त्याचे लग्न थानगावमधील लालपूर येथील नसीमुनशी झालं होतं. पण लग्नानंतर त्याची पत्नी रात्री नागीण बनते आणि त्याला (पतीला) दंश करून जीवे मारण्याचा प्रयत्न करते. मात्र मी लगेच जागा होतो, त्यामुळे तिचे मनसुबे आत्तापर्यंत पूर्ण झाले नाहीत, असा दावा त्या तरूणाने केला.
याआधीही समोर आला होता असा प्रकार
एसडीएमने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याने आधीच त्याच्या पत्नीचे भूत काढलं आहे. महमूदाबाद पोलिस ठाण्यातही निर्णय झाला , परंतु समस्या अद्याप सुटलेली नाही. मार्चच्या सुरुवातीला, महोबा येथील एका पतीने अशीच तक्रार दाखल केली होती. त्याने दावा केला होता की त्याची पत्नी एका रात्रीत सापात रूपांतरित झाली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली होती.
