जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांचा गोळीबार, 20 हून अधिक पर्यटक ठार
पर्यटकांवर गोळीबार केल्याच्या या घटनेनंतर सुरक्षा दलानी या परिसराची संपूर्ण घेराबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. अतिरेक्यांनी शोधण्यासाठी मोठी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात २० हून अधिक पर्यटक ठार झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक ठार झाले आहेत. हा हल्ला जम्मूच्य पहलगाम जिल्ह्यातील बैसरण परिसरात झाल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही.
यापूर्वी झालेले हल्लेः
18 मे 2024 हल्ला:
पहलगाममधील यन्नर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी जयपूर येथील पर्यटक दांपत्यावर (तबरेज आणि फरहा खान) गोळीबार केला होता. फरहाला खांद्याला आणि तबरेजला चेहऱ्यावर गोळी लागली होती. दोघांनाही श्रीनगरमधील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या हल्ल्यातील दोन संशयित दहशतवाद्यांना (वसीम अहमद शाह आणि आदनान अहमद बैग) 28 मे 2024 रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, ग्रेनेड आणि 120 एके राउंड्स जप्त केले गेले.
6 मे 2022 चकमक:
पहलगामच्या सिरचन टॉप जंगल परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मुहम्मद अशरफ खान उर्फ मौलवी आणि दोन अन्य दहशतवादी ठार झाले होते.
2 ऑगस्ट 2000 :
पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले आहेत, विशेषत: अमरनाथ यात्रेदरम्यान 2 ऑगस्ट 2000 रोजी नुनवान बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 32 जण ठार झाले होते, यात 21 हिंदू भाविक, 7 मुस्लिम दुकानदार आणि 3 सुरक्षा जवानांचा समावेश होता.
सद्यस्थिती:
पहलगाम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीमुळे आणि अलीकडील हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे तपास आणि गस्त घालत आहेत.
पर्यटकांमध्ये भीती
पहलगाम हे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अशा हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, विशेषत: मे-जूनच्या पर्यटन हंगामात आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.
