जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक
Amit Thackeray on Jantar Mantar: सोनम वांगचुक यांना आज पहाटेच पोलिसांनी उचलून नेले. मनसेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरे हे जंतर मंतरवर पोहचले. त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली. त्यांच्या एका घोषणेने सरकारचे टेन्शन वाढले आहे.

Amit Thackeray-Sonam Wangchuk-Abhijeet Dipke: सोनम वांगचुक यांना पोलिसांनी पहाटेच उचलून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या कृतीला उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध केला. मोठा वाद निर्माण झाला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी लागलीच आंदोलनाची धुरा सांभाळली. आमरण उपोषण जाहीर केले. या घडामोडींमुळे देशात सरकारविरोधात, विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे. मनसेने वांगचुक यांच्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर त्यांना भेटण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे दिल्लीतील जंतरमंतरवर पोहचले. आजच्या या घडामोडींवर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार
माझ्या माहितीनुसार, सोनम वांगचुक हे थोड्यावेळाने पत्रकार परिषद घेणार आहेत. लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला ते ऐकावंच लागेल, कारण या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलं आहे. ज्यांनी तुम्हाला तिकडं बसवलं, त्यांचचं म्हणणं तुम्ही ऐकणार नाहीत का? खूप चुकीच्या दिशेने आपला देश जात आहे, असा आरोप मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला.
अभिजीत दीपके यांना सकाळपासून काय झालं याची विचारपूस केली. वांगचुक यांना पडदा लावून घेऊन गेले. चार पाच पोलीस साध्या वेषात आले होते. त्यांनी त्यांना उचलून नेले. वांगचुक यांची तब्येत कशी आहे याची विचारपूस केली. आमच्या दोघांचंही हेच म्हणणं आहे की आंदोलन आता देशभर पोहचलं पाहिजे. महाराष्ट्रातही आंदोलन करण्याविषयी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठरवू. चर्चा केल्यावर या आंदोलनाची दिशा ठरेल, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अमित ठाकरे यांनी सरकारला सुनावले
अभिजीत दीपके यांना पोलिसांनी मारहाण केली. शिविगाळ केली हे अत्यंत चुकीचं आहे. हायकोर्टाने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं का? असा सवाल त्यांनी पोलिसांसह सरकारला विचारला. वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घ्या असे हायकोर्टाने सरकारला सांगितले आहे. ते सोडून या सरकारने सगळं केलं, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला.
हा भारताच्या लोकशाहीतील काळा दिवस
विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, तरी हे सरकार शांत आहे. विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं, यासाठी हे सरकार जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी केला. तर हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. तर दिल्लीतील आंदोलन देशभरात पोहचले पाहिजे अशी हाक अमित ठाकरे यांनी दिली.