Operation Sindoor : मोदीला जाऊन सांगा म्हणणाऱ्यांना मोदींचं चोख प्रत्युत्तर..; कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नीची प्रतिक्रिया
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी 'मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलंय' असं पर्यटकांना म्हटलं होतं. त्या दहशतवाद्यांना आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. पहलगाममधील हल्ल्यात पुण्यात राहणाऱ्या कौस्तुभ गनबोटे यांचाही मृत्यू झाला होता. गनबोटे हे कुटुंबीयांसह काश्मीरला फिरायला गेले होते. पर्यटकांवर गोळ्या झाडल्यानंतर दहशतवाद्यांनी “मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलं” असं काही महिलांना म्हटलं होतं. अशा दहशतवाद्यांना आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलंय, अशी प्रतिक्रिया गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी दिली.
“ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत समर्पक नाव आहे. मोदींनी अत्यंत योग्य पाऊल उचचलं आहे. दहशतवादी म्हणाले होते की मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलंय, त्याला आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता पाकिस्तानला चांगला धडा मिळाला आहे. जर अजूनही त्यांनी धडा घेतला नसेल तर मोदी याहून कठोर पावलं उचलतील याची खात्री आहे”, असं संगीता गनबोटे म्हणाल्या. कौस्तुभ गनबोटे हे त्यांची पत्नी संगीता, संतोष जगदाळे, त्यांची पत्नी आणि जगदाळेंची मुलगी असे सर्वजण काश्मीरला फिरायला गेले होते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश मोदी सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत होता. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना मारून निष्पाप लोकांच्या मृत्यूचा सूड घ्यावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. आता पहलगाम हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं बारकाईने निरीक्षण केलं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कोणकोणत्या ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले..
- बहावलपूरमधील दोन ठिकाणं
- मुरीदके
- मुझफ्फराबाद
- कोटली
- गुलपूर
- भिंबर
- चक अमरू
- सियालकोट
