Nepal Violence : 15000 कैदी नेपाळच्या जेलमधून पळाले, भारतात हाय अलर्ट, 60 जणांना अटक
नेपाळमध्ये उफाळलेल्या या हिंसाचाराचा फायदा घेऊन, भारत आणि नेपाळच्या सिमेवर असलेल्या विविध जेलमधून तब्बल 15000 कैदी फरार झाले आहेत. यातील 60 कैद्यांना अटक करण्यात आलं आहे.

नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून मोठा हिंसाचार सुरू आहे, सरकारने अचानक सोशल मीडियाच्या काही साइट्स वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी नेपाळचं संसद भवन पेटून दिलं, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अनेक मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले करण्यात आले, या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान नेपाळमध्ये हे आंदोलन सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे नेपाळमध्ये उफाळलेल्या या हिंसाचाराचा फायदा घेऊन, भारत आणि नेपाळच्या सिमेवर असलेल्या विविध जेलमधून तब्बल 15000 कैदी फरार झाले आहेत. यापैकी 60 कैद्यांना भारत आणि नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा दलाकडून पकडण्यात आलं आहे. पकडण्यात आलेल्या या सर्व कैद्यांना भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या चौक्यांवर ठेवण्यात आले आहे. नेपाळच्या जेलमधून फरार झालेल्या कैद्यांपैकी 22 कैद्यांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे, तर दहा कैद्यांना बिहारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तीन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा घेऊन हे कैदी फरार झाल्याचं समोर आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसएसबी च्या जवानांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून 60 कैद्यांना पकडलं आहे. पकडलेले हे सर्व कैदी त्या -त्या राज्यांच्या पोलिसांकडे सोपवण्यात येत असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आलं आहे, त्यातील दोन ते तीन लोकांनी आम्ही भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे, त्याची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोशल मीडिया साईटवर बंदी आणल्यानंतर नेपाळमध्ये आंदोलन चांगलंच पेटलं आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आक्रमक आंदोलकांनी काठमांडूसह अनेक भागांमध्ये जाळपोळ केली आहे.
