मध्यरात्री मेसेज आला… अन् हनीमूनच्या रात्रीच… नवरदेव-नवरीसाठी का रडतंय अख्खं गाव?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एका नवविवाहित जोडप्याचा रहस्यमय मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दोन दिवसांनीच नवरदेव आणि नवरी मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवरीच्या गळ्यावर काही खुणा असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशातील एका कुटुंबात दोन दिवसाआधी सनई चौघड्यांचे सूर उमटले. त्याच घरात रडारड सुरू आहे. सुहारातीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीने जीवन संपवलं. त्यामुळे अख्ख्या गावात मातम पसरलं आहे. 7 मार्च रोजी लग्न झालं, 8 मार्च रोजी नवरी माहेरून सासरी आली आणि ही घटना घडली. आज लग्नाचं प्रीतीभोजन होणार होतं. कुटुंब त्याच्या तयारीलाही लागलं होतं. पण घरातच हे आक्रीत घडल्याने कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. दोघांनीही आत्महत्या केली त्या रात्री प्रदीपला मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यानंतरच हे घडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा मेसेज कोणी पाठवला? कशासाठी पाठवला? त्यात काय होतं? याचा पोलीस तपास करत आहेत.
अयोध्येच्या सहादगतगंज मुरावना टोला येथील ही घटना आहे. येथील एका घरातील लोक लग्नाचा आनंद साजरा करत होते. या आनंदाच्या क्षणी घर अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलं होतं. कुटुंबातील लोक लग्नानंतर प्रीतीभोजनाची तयारी करत होते. पण सकाळी 7 वाजले तरी नवरदेव-नवरी त्यांच्या खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे कुटुंबाला संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण कोणतंच उत्तर आलं नाही. त्यामुळे घरातील मंडळी हैराण झाली. काही काळंबेरं तर झालं नाही ना? अशी शंका त्यांच्या मनात डोकावली.
दरवाजा तोडला अन्…
घाबरलेल्या घरातील लोकांनी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर रुममध्ये जे पाहिलं त्याने सर्वांचे धाबे दणाणले. घरात नवरी अंथरूणावर निपचित पडलेली होती. तर नवरदेव छताला लटकलेला होता. त्यामुळे घरच्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी मृतदेह रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनीही दोघांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. पण या घटनेने घरातील लोकांवर जणू आकाशच कोसळलं.
नवरदेवाचा भाऊ दीपकने याबाबतची माहिती दिली. आम्ही भाजीपाला आणण्यासाठी मंडईत गेलो होतो. बाजारात असतानाच घरून फोन आला. लवकर या म्हणून सांगितलं. आम्ही घरी पोहोचलो आणि पाहतो तर काय दोघांनीही जीवन संपवलेलं होतं. घरात कोणताच वाद नव्हता. कोणतीही नाराजी नव्हती, सर्व काही आनंदात होतं. तरीही या दोघांनी असं का केलं? हाच प्रश्न आम्हाला पडलाय, असं नवरदेवाच्या भावाने सांगितलं.
मुलीच्या आईचे रडून रडून हाल
7 मार्च रोजी प्रदीपचं लग्न झालं होतं. 8 मार्च रोजी नवरी माहेरून आली होती. आज त्यांच्या रिसेप्शनची तयारी सुरू होती. पण या भयंकर घटनेने घरात मातम पसरला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून नवरदेवाच्या आईला तर धक्काच बसला आहे. तिचे रडून रडून हाल झाले आहेत. तिचे डोळे सूजले आहेत. आपल्यावर जणू आकाशच कोसळलंय, अशी ती सारखी म्हणत आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं खरं कारण कळणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
रात्री मेसेज आला अन्…
पोलिसांच्या हाती या घटनेचा एक कच्चा दुवा लागला आहे. चर्चेनुसार रात्री पावणे बारा वाजता नवरदेव प्रदीपच्या फोनवर एक मेसेज आला. त्यानंतर त्याचे नवरी शिवानीशी कडाक्याचं भांडण झालं. अन् सकाळी दोघांचे खोलीत मृतदेह आढळले. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, ते दोघेही रात्री 12 वाजेपर्यंत जागे होते. म्हणजे ही घटना रात्री 1 किंवा 2च्या दरम्यान घडली असावी. पण दोघांमध्ये वाद होण्याचं कारण काही समजलं नाही. दोघांच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. विष सापडलं नाही. किंवा एखादी संदिग्ध वस्तूही सापडली नाही. पण नवरीच्या गळ्यावर काही निशाण सापडले आहेत. नवरीची गळा दाबून हत्या केली गेली असावी असं सांगितलं जातं. नवरीला मारल्यानंतर प्रदीपने आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तिसरा व्यक्ती आत आल्याची शक्यता फार कमी आहे. पोलिसांनी प्रदीपचा मोबाईल जप्त केला आहे. अधिक तपास सुरू आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावरच या प्रकरणाची अधिक माहिती मिळणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
खासदाराकडून शोक व्यक्त
आम्ही प्रत्येक अँगलने चौकशी करत आहोत. आत्महत्या आहे की आणखी काही आहे हे पाहत आहोत. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असं एसएसपी राज करण यांनी सांगितलं. तर या घटनेची माहिती मिळताच समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश प्रसाद घटनास्थळी आले. त्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
