
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची बाजू मांडण्यासाठी भारतातील खासदारांचं शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावर जाणार आहे. खासदारांचे आठ गट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक गट जगातील महत्त्वाच्या देशात जाऊन आपली बाजू मांडणार आहे. आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यासाठी भाजपने खासदारांचे गट तयार केले आहेत. विरोधकांकडून प्रतिनिधी मंडळासाठी खासदारांची नावे मागवण्यात आली होती. खासदाराच्या एका गटात भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर यांच्या नावाचा समावेश केला आहे. या शिष्टमंडळात निवड केल्याबद्दल थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर काँग्रेसने मात्र, थरूर यांचे नाव शिष्टमंडळात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. काँग्रेसने थरूर यांचं नावच दिलं नव्हतं, तरीही भाजपने त्यांच्या नावाचा समावेश केल्याने भाजपच्या या खेळीने काँग्रेसला धक्का बसला आहे.
खासदारांच्या या प्रतिनिधी मंडळाचं काँग्रेसचे खासदार शशि थरूर हे नेतृत्व करणार आहेत. तशी घोषणा संसदीय कार्य मंत्रालयाने केली आहे. या प्रतिनिधी मंडळात भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जनता दल (यूनायटेड)चे खासदार संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आणि शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे असणार आहेत. गंमत म्हणजे या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी काँग्रेसने ज्या चार खासदारांची नावे दिली होती, त्यापैकी एकाचीही शिष्टमंडळात निवड करण्यात आलेली नाही.
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्या अनुसार, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 16 मे रोजी सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच पाकिस्तानविरोधी दहशतवादावर भारताची स्थिती स्पष्ट करण्यासाठी विदेशात जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळासाठी चार नावे सूचवावी, अशी विनंती करण्यात आली. 16 मे रोजी दुपारपर्यंत राहुल गांधी यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र लिहून काँग्रेसकडून आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सैयद नसीर हुसैन आणि राजा बरार यांची नावे पाठवली. पण केंद्र सरकारने या चारही नावांना डावलून शशि थरूर यांच्या नावाचा प्रतिनिधी मंडळात समावेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भारत सरकारचं हे सात सदस्यीय सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ 23 मेपासून 10 दिवसाच्या राजकीय मिशनवर जाणार आहे. वॉशिंग्टन, लंडन, अबू धाबी, प्रिटोरिया आणि टोक्यो सारख्या प्रमुख राजधानीच्या शहरात ही सर्व पक्षीय टीम जाईल. तसेच भारताची झिरो टॉलरन्स पॉलिसी आणि ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत सध्याच्या घटनाक्रमाची माहिती परदेशातील सरकारांना देणार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या बदल्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिक मारले गेले होते. त्यामुळेच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून जैश, लष्कर आणि हिज्बुलच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आली. त्यात 100 हून अधिक अतिरेकी मारले गेले होते.