Operation Sindoor : शशी थरूर ,सुप्रिया सुळे फाडणार पाकचा बुरखा, मोदी सरकारने कुणा-कुणावर दिली जबाबदारी ?
ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देश एकत्र उभा राहिला आहे. राजकीय मतभेद विसरून, सर्वजण देशासाठी एकत्र उभे असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. याचदरम्यान मोदी सरकारने काँग्रेस नेते शशी थरूर तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते दोघेही पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल पोलखोल करण्यात येणार आहे.

भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत त्यांचा नायनाट करण्याासाठी महत्वाची रणनिती आखली आहे. त्या मोहिमेअंतर्गतच संसदीय कामकाज मंत्रालयाद्वारे दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे, त्यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश असणार आहे. देशातील सर्व राजकीय दलांची 40 खासदारांची टीम सात गटात विभागली जाणार असून ते विविध देशांत जाऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल भूमिका मांडत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहेत. विशेष म्हणजे, मोदी सरकारने या खास मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे दिली आहे. यासह, थरूर आता अमेरिकेत भारताची बाजू मांडतील आणि पाकिस्तानचा बुरखा फाडतील.
ही टीम 23-24 मे दरम्यान 5 ते 8 देशांना भेट देऊन जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानसारख्या देशाचा पर्दाफाश करणार आहे. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझी सेवा आवश्यक असेल तेव्हा मी मागे हटणार नाही, असे म्हणत शशी थरूर यांनी ‘राष्ट्र प्रथम’ही भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका मांडण्यासाठी हे नेते परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या 7 शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील:
- शशि थरूर – यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
- विजयंत जय पांडा – ईस्टर्न यूरोप
- कनिमोझी – रूस
- संजय झा – साउथ ईस्ट आशिया
- रविशंकर प्रसाद – मिडल ईस्ट
- सुप्रिया सुळे – पश्चिम आशिया
- श्रीकांत शिंदे – आफ्रिकन देश
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून एक कडक संदेश दिला. या निर्णायक कारवाईला केवळ जनतेकडूनच नव्हे तर विरोधी पक्षांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरीही जेव्हा देशाच्या सुरक्षेचा आणि दहशतवादाविरुद्ध एकतेचा प्रश्न येतो तेव्हा संपूर्ण राजकीय नेतृत्व एकजूट असल्याचे चित्र यावेळीही दिसून आले.
8 देशांत जाणार प्रतिनिधीमंडळ
भारताची हीच राजकीय एकता आता जगभर दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे एक शिष्टमंडळ 8 वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न सुरू आहेत, ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ही योजना आखली आहे.
पहिल्या टप्प्यात 8 ग्रुप्स तयार करण्यात आले असून प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या देशाचा दौरा करेल. या गटांमध्ये सर्व पक्षांच्या खासदारांचा समावेश केला जात आहे, दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई केवळ सरकारची नाही तर संपूर्ण देशाची आहे,हे याद्वारे स्पष्ट करण्यात येईल.
उद्देश काय ?
प्रत्येक शिष्टमंडळात सुमारे अर्धा डझन खासदार असतील आणि सर्व राजकीय पक्षांचे नेते त्यामध्ये नेतृत्वाची भूमिका बजावतील. पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवादी संरचनांनी भारताच्या सार्वभौमत्वावर कसा हल्ला केला आणि त्याला भारताने संयम आणि दृढनिश्चयाने कसे उत्तर दिले हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्ट करणं आणि पाकिस्तानचा पर्दाफाश करणं हे या खासदारांचे उद्दिष्ट असेल.
भारताला ही बदल्याची कारवाई का आणि कशी करावी लागली हे परदेशी सरकार, थिंक टँक, मीडिया संस्था आणि धोरणकर्त्यांना सांगणे हाच या ८ शिष्टमंडळांचा उद्देश असेल. भारताने कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले नाही तर भारत फक्त आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी उभा राहिला हेही ते स्पष्ट करतील.
दौऱ्यावर कधी जाणार शिष्टमंडळ?
22 मे नंतर खासदारांचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाण्यास सुरुवात होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात सुमारे 43/45 खासदारांची नावे समाविष्ट केली जातील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, खालील खासदारांची नावे त्यात समाविष्ट आहेत
- प्रेमचंद गुप्ता, आरजेडी
- संजय झा, जेडीयू- जपानला जाणार
- रविशंकर प्रसाद, बीजेपी- मिडिलईस्ट येथे जाणार
- विजयंत जय पांडा- भाजप
- अनुराग ठाकुर – भाजप
- बृजलाल, भाजप
- तेजस्वी सूर्या, भाजप
- अपराजिता सारंगी, भाजप
- राजीव प्रताप रूडी, भाजप
- डी पुरंदेश्वरी – भाजप
- श्रीकांत शिंदे – शिवसेना शिंदे
- सुप्रिया सुळे – एनसीपी (शरद पवार)
- सस्मित पात्रा – (बीजेडी)
- समिक भट्टाचार्य- (भाजप)
- मनीष तिवारी – (कांग्रेस)
- शशि थरूर – कांग्रेस
- अमर सिंह- कांग्रेस
- प्रियंका चतुर्वेदी – शिवसेना उद्धव ठाकरे गट
- जॉन बिट्स- सीपीआयएम
- असदुद्दीन ओवैसी- AIMIM
देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अखंड, अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध – सुप्रिया सुळे
या शिष्टमंडळात समावेश केल्याबद्दल, ही संधी प्रदान केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे आभार मानले.
सीमेपलीकडून पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करीत आहे . त्याचा भांडाफोड होऊन मुखवटा फाटणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास भारत तयार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे भारताने वेळोवेळी जगाला दाखवून दिले ही वस्तुस्थिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या,.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्रतिनिधी म्हणून देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली हा मोठा बहुमान आहे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर सातत्याने टाकलेला विश्वास, दिलेले अलोट प्रेम आणि सेवेची संधी यामुळेच हे शक्य झाले आहे. याबद्दल आपण सर्वांचे ॠणी आहोत, अशी भावना खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अखंड, अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असे सांगत सुळे यांनी दहशतवादाविरोधात भारताची भूमिका जागतिक पटलावर मांडण्यास समस्त देशवासियांच्या वतीने आपण कटिबद्ध आहोत, असेही नमूद केले.
