मुस्लीम राष्ट्रांच्या दौऱ्यावरुन परतताच ओवैसींचे भाजपसंदर्भात महत्वाचे विधान, थेट म्हणाले, ‘विदेशात भाजपसाठी…’
विदेशात आम्ही भाजपसाठी गेलो होतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गेलो होतो का? नाही. आम्ही आमच्या देशासाठी गेलो होतो. भारताचा आवाज जगभर मांडण्यासाठी गेलो होतो. पाकिस्तानचे नापाक उद्योग उघड करण्यासाठी गेलो होता, असे ओवैसी यांनी म्हटले.

AIMIM Owaisi on Pakistan Terrorism: एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी भारत सरकारच्या शिष्टमंडळासोबत विविध देशांच्या दौऱ्यावर गेले होते. विदेशातून ओवैसी यांनी पाकिस्तानवर कठोर प्रहार केला. मुस्लीम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन आणि अल्जीरियात जाऊन त्यांनी भारताची भूमिका ठोसपणे मांडली. पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेला पाठिंबा जगासमोर उघड केला. भारतात परत आल्यानंतर ओवैसी यांनी भारतीय जनता पक्षासोबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले ओवैसी?
भारत सरकारने सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवले होते. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना देण्यात येणारा पाठिंबा उघड करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते. त्यातील एका शिष्टमंडळात ओवैसी यांचा समावेश होता. भारतात परत आल्यावर ओवैसी म्हणाले, खासदारांचे प्रतिनिधी मंडळ ज्या, ज्या देशांच्या दौऱ्यात गेले, त्या ठिकाणी चांगला पाठिंबा मिळाला.
आम्ही त्या देशातील लोकांना अनेक बाबी सांगितल्या. ते लोक भारतासंदर्भात सकारात्मक होते. बाहेरच्या देशांमध्ये आम्हाला विचारण्यात आले की, तुम्ही पाकिस्तानसोबत चर्चा का नाही करत? त्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करत म्हणालो, 26/11 चा हल्ला झाला तेव्हा आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा केली होती. पठाणकोट हल्ला झाल्यानंतर आयएसआयला बोलवून त्यांच्यासमोर सर्व काही मांडले. त्यानंतरही दहशतवाद्यांविरोधात कोणतेही पाऊल पाकिस्तानने उचलले नाही. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याबाबत पुरावे आमच्याकडे आहेत. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ते दोन्ही मेल पाकिस्तान मिलिट्री कँटोनमेंटच्या भागातून करण्यात आले होते. हे पाकिस्तान कसे नाकारणार?
ओवैसी यांना विचारण्यात आले की, विरोधी पक्ष देशात काही वेगळे बोलत आहे. विदेशात जाऊन काही वेगळी भूमिका मांडत आहे. त्यावर ते म्हणाले, आम्ही भाजपच्या विरोधात राहिलो आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला विरोधच करणार आहे. विदेशात आम्ही भाजपसाठी गेलो होतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गेलो होतो का? नाही. आम्ही आमच्या देशासाठी गेलो होतो. भारताचा आवाज जगभर मांडण्यासाठी गेलो होतो. पाकिस्तानचे नापाक उद्योग उघड करण्यासाठी गेलो होता. कोणत्या व्यक्ती किंवा पक्षासाठी आम्ही दुसऱ्या देशांच्या दौऱ्यावर गेलो नाही, असे ओवैसी यांनी म्हटले.
