पहलगाम शब्दाचा नेमका अर्थ काय? हिंदू धर्माशी आहे खास कनेक्शन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर या ठिकाणाचा इतिहास आणि नाव याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून, हिंदू पौराणिक कथेनुसारही याचे महत्त्व आहे. हल्ल्यामुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणाला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर आता तिथे भयाण शांतता पसरली आहे. जम्मू काश्मीरमधील सर्वच रस्ते हे ओस पडले आहेत. भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र भीती आणि दहशत पसरली आहे. मात्र पहलगाम नाव नक्की कसं पडलं? त्या ठिकाणी नेमकं काय आहे? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हिंसाचार घडवला, त्यामुळे हे ठिकाण चर्चेत आले. काश्मीरमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या पहलगाम या नावाचा अर्थ काय आहे आणि या ठिकाणाला हे नाव कसे पडले, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.पहलगाम हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जात होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी हिरवीगार झाडं, घनदाट जंगल आणि प्राचीन तलाव पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. या ठिकाणाला जणू स्वर्गाचेच रूप मानले जाते.
पहलगामचा अर्थ काय?
प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे काहीतरी इतिहास दडलेला असतो. पहलगामच्या बाबतीतही असेच आहे. पहलगाम विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, पहलगामचे नाव दोन कश्मिरी शब्द मिळून बनलेले आहे. यामध्ये ‘पुहेल’ (पहल) म्हणजे मेंढपाळ आणि ‘गोअम’ (गाम) म्हणजे गाव. पूर्वी या ठिकाणाला पुहेलगोअम असे म्हटले जायचे. यानंतर त्याला पहलगाम म्हणून ओळखले जाऊ लागले आणि याचा थेट अर्थ मेंढपाळांचे गाव असा होतो.
काही लोकांच्या मते हिंदू मान्यतेनुसार याला ‘बैलांचे गाव’ असेही म्हटले जाते. मुगल बादशाह अकबर यांचे हे आवडते ठिकाण होते. ते उन्हाळ्यामध्ये येथे राहण्यासाठी यायचे. जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनाही या थंड हवेच्या ठिकाणाने खूप आकर्षित केले होते.
भगवान शंकरासोबत आहे नाते
हिंदू पौराणिक कथांनुसार, पहलगामचा संबंध ऋषी कश्यप यांच्याशी जोडलेला आहे. या ठिकाणी अनेक संत आणि ऋषीमुनींना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. या ठिकाणी भगवान शंकराचे ममलेश्वर मंदिर देखील आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी अमरनाथ गुहेकडे जात होते, तेव्हा त्यांनी आपला वाहन नंदी बैलाला याच ठिकाणी सोडले होते. अमरनाथ गुहेचा मार्ग येथून केवळ 48 किलोमीटर अंतरावर आहे, जो भाविक 3 ते 5 दिवसांत पूर्ण करतात.
पहलगाम हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. मात्र या शांत ठिकाणाला दहशतवादाच्या क्रूर घटनेमुळे कायमचा डाग लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पहलगाम केवळ आपल्या सौंदर्यासाठी नव्हे, तर येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणींसाठीदेखील ओळखले जाईल.